मुंबई, 22 जुलै : मुंबईत दूरच्या उपनगरांतून नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची सहनशक्ती बुधवारी सकाळी अखेर संपली. नालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरत रेल रोको आंदोलन केलं. सरकार आता सामान्यांसाठी रेल्वे सुरू करणार का, असा प्रश्न विचारल्यावर लोकांची मागणी रास्त आहे पण सोशल डिस्टन्सिंगचं काय, असं म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थेट उत्तर द्यायचं टाळलं.
राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन करणार नाही, असं स्पष्ट करताना आरोग्य मंत्र्यांनी लोकलसेवा सुरू करण्याचा निर्णय सीएम घेतील, असं म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चेंडू टोलावला.
Unlock सुरू झालं, खासगी कार्यालयं सुरू झाली पण लोकल सेवा सामान्यांसाठी सुरू झाली नाही. त्यामुळे नालासोपाऱ्यात एसटीची वाट पाहून वैतागलेल्या चाकरमान्यांनी थेट रेल्वे रुळावर उतरून रेल रोको आंदोलन केलं.
VIDEO - अखेर चाकरमान्यांचा बांध फुटला,'मुंबई लोकल सुरू करा' नालासोपाऱ्यात रेल्वे रोको
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी आरोग्यमंत्री बोलत असताना या आंदोलनावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. "नालासोपारा वसई विरार मधून मोठ्या संख्येने लोक कामासाठी मुंबईत येत असतात. लोकल सेवा सुरू करावी, ही या लोकांची मागणी आहे, ती रास्त आहे. पण लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही", असं टोपे म्हणाले. ट्रेन सुरू करण्यासंदर्भात CM निर्णय घेतील, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निर्णय ढकलला.
मॉल आणि जिम सुरू होणार का?
ठाणे आणि पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागला. पण आता या Unlock नंतर पुन्हा lockdown होणार नाही, असं टोपे यांनी स्पष्ट केलं. या वेळी जास्तीत जास्त गोष्टी सुरू करण्याचा विचार आहे. जिम सुरू करण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे. अनेक लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यांचं मोठं नुकसात होत आहे. शॉपिंग मॉलसुद्धा सुरू करण्याबद्दल विचार केला जाईल, असं आश्वासन टोपेंनी दिलं.