सागर कुलकर्णी, मुंबई 18 जुलै : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरला झालेल्या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी थोरातांना प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं दिलीत. कार्यक्रमाला काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना थोरात यांनी भाजपवर टीका करतानाच पक्षाच्या नेत्यांनाही कानपिचक्या दिल्यात. आता गट तट, मतभेद विसरा आणि कामाला लागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पक्षावरचं संकट मोठं आहे. काँग्रेसमध्ये अशी संकटं पचविण्याची ताकद आहे या संकटातून बाहेर पडून राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येईल असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. जिथ हवे तिथ तरूण नवीन चेहरे आणि महिलांना संधी देईल जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कोण काय म्हणालं?
बाळासाहेब थोरात -
लोकशाही धोक्यात आणण्याचे काम केलं जात आहे, धर्मांच्या नावावर मतं मागणार नाही. यापूर्वी इतिहास आहे की लोक लोकसभा आणि विधानसभेसाठी वेगळे निकाल देतात, राजस्थान मध्य प्रदेशात हे दिसून आलं त्यामुळे कामाला लागा.
या आधी ही परिस्थिती वाईट होती मात्र सत्ता आपली आली होती. जर पुन्हा एकदा आपण सर्वांनी एकत्र कामाला लागलो तर 1980 ची पुनरावृत्ती होईल आणि आपला मुख्यमंत्री होईल. लोकांना भेटा लोकांनी घरात ठेवलेले बिल्ले परत काढले पाहिजे.
मी गटतटत मी मानत नाही. मी तयार आहे पण तुम्हीही ते विसरले पाहिजे. कारण संकट मोठं आहे. काँग्रेसने अनेकदा प्रतिकूल परिस्थिती काम करत सत्ता संपादन केली.
जसा मी अध्यक्ष झालो तसंच चंद्रकांत पाटील भाजपचे अध्यक्ष झाले. काल त्यांना पत्रकारांनी विचारलं की पुढे मंत्री पदाचा राजीनामा देणार का? त्यावर ते म्हणाले की मी कोऱ्या पाकिटासारखा आहे. वरतून त्यावर जे लिहितील तिकडे जायला मी तयार आहे.ज्याला स्वतः काय होयच हे माहीत नाही ते आमचं काय भविष्य सांगणार.
अशोक चव्हाण -
पक्षांतर्गत बंदीच्या कायद्याला भाजपने हरताळ फासला आहे. वंचितने मोठ्या प्रमाणावर आपलं नुकसान केलं आहे. 9 ते 10 जागांचं आपलं नुकसान केलं आहे, पुढे ही आपले नुकसान करण्याचे भाजपचा हा प्रयन्त आहे. सत्ता असता अध्यक्ष आणि सत्ता नसताना अध्यक्ष यात फरक आहे. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी मला राजीनामा द्यायला नाही सांगितलं. मी स्वतःहून जबाबदारी घेऊन राजीनामा दिला.
सुशीलकुमार शिंदे -
सर्व मतभेद विसरुन, आपले तंटे विसरुन पुढे जावं लागेल, सर्वांना काम करावे लागेल. नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागेल. महाराष्ट्राला माहिती असलेला नेता बाळासाहेब थोरात आहेत, त्यांनी सत्तेची कधी मस्ती केली नाही. आपल्यातून जे बाहेर गेले आहेत त्यांना परत आणण्याचा काम करूया.
पृथ्वीराज चव्हाण -
आचारसंहितेला जेमतेम 2 महिने आहेत, वेळ कमी असला तरी काँग्रेस कार्यकर्ते या लढाईत उत्साहाने उतरतील. शून्यातून पक्षाला उभं करू. विजयाचा निर्धार करू. आपण या सरकारचे जितके वाभाडे काढायला पाहिजे होते तितके काढले नाही, आपण कमी पडलो पण आपण प्रयत्न करू.