उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला नाही, शिवसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला नाही, शिवसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप

मंत्रिमंडळाच्या विस्ताराविरोधात आता नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीतली नाराजी उघड झाली होती. काँग्रेसमध्येही कुरबूर सुरू आहे. आता शिवसेनेतही नाराजीचे सूर उमटू लागले असून अंतर्गत वाद उफाळून आलाय.

  • Share this:

मुंबई 31 डिसेंबर : उद्धव ठाकरे सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला. मात्र या विस्ताराविरोधात आता नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीतली नाराजी उघड झाली होती. काँग्रेसमध्येही कुरबूर सुरू आहे. आता शिवसेनेतही नाराजीचे सूर उमटू लागले असून अंतर्गत वाद उफाळून आलाय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार आहे. वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शिवसेनेचे गुहागरचे आमदार आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनीही नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवलीय. उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. या नाराजी नाट्यामुळे आमदारांमध्ये असंतोष वाढतोय.

तर आघाडी सरकारमुळे सगळ्याच पक्षांना आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेताना मर्यादा येत असल्याने असंतुष्ट आमदारांची नाराजी कशी दूर करायची असा प्रश्न शिवसेनेच्या नेतृत्वापुढे निर्माण झालाय.

भास्कर जाधव म्हणाले, मी राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदही भूषवलंय. एवढा अनुभव असताना मी कुठे कमी पडतोय ते मला कळत नाही. शिवसेनेनेत पक्ष प्रवेश करताना माझी उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली होती. त्यांनीही आश्वासनं दिली होती. मात्र ती पाळली गेली नाहीत. मला कशाचा मोह नाही, मात्र दिलेलं आश्वासन पाळायला पाहिजे.

प्रणिती शिंदेंना का डावललं? कार्यकर्त्यांने सोनिया गांधींना लिहिले रक्ताने पत्र

माझा अनुभव पाहाता माझा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी मला आशा होती. माझ्या अनुभवाचा फायदा उद्धव ठाकरे यांना करून देता येईल असं मला वाटत होतं. मात्र तसं काहीच झालं नाही. उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली असून त्यांना भेटून मी सर्व काही सांगणार आहे असंही ते म्हणाले. या आधी शिवसेनेच्या वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनीही नाराजी व्यक्त केली होती.

काँग्रेसमध्येही नाराजी

नाराजी नाट्य कोल्हापुरात देखील पाहायला मिळतय. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि पी. एन. पाटील यांच्यामध्ये मंत्रिपदासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर पक्षांना मंत्रिपदाची माळ सतेज पाटील यांच्या गळ्यात पक्षश्रेष्ठींनी टाकलीय. यामुळं पी.एन.समर्थक नाराज आहेत. गेली चाळीस वर्ष पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या आणि पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या आमदार पी. एन. पाटील यांच्या पक्ष निष्ठेचं हेच फळ का असा सवाल करत पक्षनिष्ठेची नियमावली सांगा आणि त्यात आम्ही कुठे कमी पडलो हे देखील दाखवून द्या असा आक्रमक पवित्रा पी. एन. पाटील यांच्या समर्थकांनी घेतलाय.

पुण्यात संग्राम थोपटेंचे कार्यकर्ते आक्रमक, काँग्रेस भवन फोडलं

दरम्यान पीएन समर्थकांचा बुधवारी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात पक्षात राहण्याबद्दल आमदार पी. एन. पाटील(P. N. Patil) यांना फेरविचार करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून होऊ शकतो. असं असलं तरी पक्षावर नाराज असलेल्या पी. एन. पाटील यांनी सध्या तरी या सगळ्या प्रकारावर मौन बाळगलय. तसं झालं तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसला फटका बसू शकतो. त्यामुळे पाटील यांच्या 1 जानेवारीला होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यावर सर्वांचं लक्ष लागलंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 31, 2019, 7:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading