कोरोनामुक्त गावात 10वी, 12वीचे वर्ग सुरू होणार? मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वपूर्ण निर्देश

कोरोनामुक्त गावात 10वी, 12वीचे वर्ग सुरू होणार? मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वपूर्ण निर्देश

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असून अनेक गावांत कोरोनाचा एकही रुग्ण नाहीये. अशा परिस्थितीत आता दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जून: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी होत आहे. राज्यातील (Maharashtra) रिकव्हरी रेटही वाढत आहे. त्यामुळे इयत्ता 10वी (SSC) आणि 12वीचे (HSC) वर्ग कोरोनामुक्त झालेल्या गावांत सुरू करण्यात येऊ शकतात का याबाबतची चाचपणी आता सुरू झाली आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठकही संपन्न झाली.

जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत. तसेच भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता 10वी आणि 12वी चे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पहावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यात ही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावांमधील 10 वी तसेच 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

'डेल्टा प्लसमुळे रुग्ण सीरिअस होण्याचे प्रमाण अधिक, तरी घाबरू नका' आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे अशी माहिती प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मुल्याकंन करतांना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या 12 वीच्या मुल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने इयत्ता 10 वी साठी मुल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करून 12 वीच्या विद्यार्थ्यांचे गुण मुल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Published by: Sunil Desale
First published: June 22, 2021, 7:30 PM IST

ताज्या बातम्या