उद्धव ठाकरेंनी फिरवली 'भाकरी', प्रस्थापितांना डावलले, गावपाड्यातील लोकप्रतिनिधींना संधी

उद्धव ठाकरेंनी फिरवली 'भाकरी', प्रस्थापितांना डावलले, गावपाड्यातील लोकप्रतिनिधींना संधी

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मोठे निर्णय घेतले आहेत. पक्षातील प्रस्थापितांना दूर करून नवीन चेहऱ्यांनी पसंती देण्यात आली आहे

  • Share this:

मुंबई,30 डिसेंबर: शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात मोठे निर्णय घेतले आहेत. पक्षातील प्रस्थापितांना दूर करून नवीन चेहऱ्यांनी पसंती देण्यात आली आहे. यामध्ये मागच्या सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या मंत्र्यांचाही समावेश असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेने दिग्गज आमदारांना वगळले. जे माजी मंत्री देखील होते. त्यात दिवाकर रावते, रामदास कदम, तानाजी सावंत, रवींद्र वायकर, दीपक केसरकर यांचा समावेश आहे.

उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण महाराष्ट्रात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी गावपाड्यातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना संधी देण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेतील फक्त आमदार अनिल परब यांनाच मंत्रिमंडळासाठी अधिकृत फोनवरून निरोप देण्यात आलाा आहे. तसेच जे दिग्गज आमदार मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार होते, त्यांना अद्यापही निरोप देण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे शिवसेनेत पक्षांतर्गत मोठे बदल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्तारात सत्तेची भाकरी फिरवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल एक महिन्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लाभला आहे. साेमवारी शिवसेना 13, राष्ट्रवादी 13 आणि काँग्रेसच्या 10 मंत्र्यांना राज्यपाल पद व गोपनीयतेची शपथ देतील. विधानभवनाच्या प्रांगणात दुपारी एक वाजता हा कार्यक्रम हाेणार असून त्याच्या तयारीसाठी रविवारी दिवसभर राजशिष्टाचार विभागाकडून लगबग सुरू होती.

उपमुख्यमंत्रिपदासह गृहखातेही दादांकडे?

राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाकरेंच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. त्यांच्याकडे पुन्हा उपमुख्यमंत्रिपद देण्याबराेबरच गृह खात्याची जबाबदारीही दिली जाऊ शकते. दुसरीकडे, बच्चू कडूंची लाॅटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीपल रिपब्लिक पार्टी, प्रहार संघटना या छोट्या पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसाेबत निवडणुका लढवल्या होत्या. परंतु यापैकी आमदार बच्चू कडू वगळता एकाही घटक पक्षाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची चिन्हे नाहीत.

महाविकास आघाडीचे संभाव्य मंत्रिमंडळ

शिवसेना:

गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, अनिल परब, शंभूराजे देसाई, उदय सामंत, बच्चू कडू, अब्दूल सत्तार, संदिपान भुमरे, राजेंद्र पाटील-येड्रावकर, शंकरराव गडाख

राष्ट्रवादी:

अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, डॉ.राजेंद्र शिंगणे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, अदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे

काँग्रेस:

अशोक चव्हाण, के.सी.पाडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, सतेज पाटील आणि डॉ. विश्वजीत कदम राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: December 30, 2019, 8:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading