महाराष्ट्र विधिमंडळाचं अखेर ठरलं; 2 दिवसांचं अधिवेशन आणि PA ला प्रवेश नाही

महाराष्ट्र विधिमंडळाचं अखेर ठरलं; 2 दिवसांचं अधिवेशन आणि PA ला प्रवेश नाही

येत्या 7 आणि 8 सप्टेंबरला राज्य विधिमंडळाचं अधिवेशन मुंबईत होईल, विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला.

  • Share this:

मुंबई, 25 ऑगस्ट : महाराष्ट्रात विधिमंडळ अधिवेशन कधी होणार याचा निर्णय शेवटी झाला. Coronavirus च्या पार्श्वभूमीवर आमदारांना एकत्र बोलवून सत्र घ्यायचं की नाही, यावर चर्चा सुरू होती. पण शेवटी आता फक्त दोन दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन घ्यायचा निर्णय झाला आहे.

महाराष्ट्रात Coronavirus चं थैमान अद्याप कमी झालेलं नाही. अनेक नेते, आमदार, मंत्री यांनाही या विषाणूची लागण झालेली आहे. अनेक जण यातून बरेही झाले आहेत. पण अशा वेळी राज्यभरात एकत्र संमेलनं, बैठका यावर बंदी असताना विधिमंडळाचं अधिवेशन घ्यायचं का हे ठरलं नव्हतं. पण अत्यावश्यक विधेयकं आणि पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं अधिवेशन बोलावण्याचा निर्णय झाला आहे. येत्या 7 आणि 8 सप्टेंबरला राज्य विधिमंडळाचं अधिवेशन मुंबईत होईल, विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला.

महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन फक्त दोनच दिवस घ्यावं, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. सप्टेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात अधिवेशन होईल आणि या अधिवेशनापूर्वी सर्व आमदारांची कोरोना चाचणी होईल, असंही ठरलं आहे. आमदारांचा Covid-19 test रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच त्यांना विधिमंडळात प्रवेश दिला जाईल. तसंच आमदारांना सोशल डिस्टन्सिंग पाळूनच विधिमंडळात बसावं लागेल. मास्क बंधनकारक असेल आणि आपल्या साहाय्यकांना घेऊन आमदारांनी येऊ नये, असंही आवाहन करण्यात आलं आहे.

हे वाचा - Unlock - 4 : केंद्राच्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

विधिमंडळात आमदारांच्या PA ला प्रवेश मिळणार नाही, असं ठरवण्यात आलं आहे. विधिमंडळातली गर्दी कमी करण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळता यावेत यासाठी मोजकी उपस्थिती असेल. दोन दिवसात विधेयकं, त्यावर चर्चा आणि पुरवणी मागण्या इतकंच कामकाज होणार आहे.

दरम्यान, दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशनसुद्धा सप्टेंबरमध्ये होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरवर्षी जूनमध्ये सुरू होणारं पावसाळी अधिवेशन COVID मुळे लांबलं आहे. ते आता 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 25, 2020, 7:08 PM IST

ताज्या बातम्या