आघाडीचा 'शपथनामा' प्रसिद्ध, बेरोजगारांना देणार 5 हजार रुपये 'बेरोजगारी भत्ता'

आघाडीचा 'शपथनामा' प्रसिद्ध, बेरोजगारांना देणार 5 हजार रुपये 'बेरोजगारी भत्ता'

राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना स्वतंत्र कृषी बजेट, संपूर्ण कर्जमाफी, बेरोजगार तरुणांना 5 हजार रुपये बेरोजगारी भत्ता

  • Share this:

मुंबई, 7 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आपला शपथनामा अर्थात जाहीरनामा सोमवारी मुंबईत प्रसिद्ध करण्यात आला.या जाहीरनाम्यात शेतकरी, शिक्षण, रोजगार, आणि आरोग्य अशा ठळक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, अनिल गोटे, एकनाथ गायकवाड उपस्थित आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 131 जागा तर काँग्रेस आणि मित्र 157 जागा लढणार आहे. लोकसंग्रामचे नेते अनिल गोटे हे आघाडीकडून धुळे मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.

बेरोजगार तरुणांना बेरोजगारी भत्ता...

राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना स्वतंत्र कृषी बजेट, संपूर्ण कर्जमाफी, बेरोजगार तरुणांना 5 हजार रुपये बेरोजगारी भत्ता, आशा वर्करला कायम सेवेत सामावून घेणार, सर्व विना अनुदानित शाळा अनुदानित करणार, आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा रुग्णालय अधिक आधुनिक बनवणार, अशी आश्वासने या जाहिरनाम्यातून देण्यात आली आहे. तसेच कामगारांना किमान वेतन २१ हजार करणार, केजी टू पीजी मोफत शिक्षण, उच्च शिक्षणासाठी शून्य टक्क्यानी कर्ज, सर्व महापालिकांमध्ये 500 फुटापर्यंत मालमत्ता कर माफ, 80 टक्के भूमिपूत्रांना नोकऱ्या, निम अंतर्गत घेतलेल्या कामगारांना कायम करणार, बचत गटांना 2 हजार कोटी अर्थ साहाय्य, खासगी सावकारांकडे जप्त जमिनी शेतकऱ्यांना परत करणार असल्याचे आश्वासन शपथपत्रातून देण्यात आले आहे.

शपथनाम्यातील ठळक मुद्दे...

- शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी, सुशिक्षित बेरोजगारांना 5 हजार मासिक भत्ता

- केजी टू पीजी मोफत शिक्षण देण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासकीय आणि अनुदानित कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची तरतूद.

- उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज, प्रत्येकाला आरोग्य विमा, कामगारांचे किमान वेतन 21 हजार, स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना.

- सर्व महापालिका हद्दीतील 500 चौ.फूट पर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, नव्या उद्योगांमध्ये ८० टक्के नोकऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना, ग्लोबल वॉर्मिंगची दखल घेवून पर्यावरण रक्षणाचे काम.

- ठिबक, तुषार सिंचनासाठी 100 टक्के अनुदान, दुधाला उत्पादनावर आधारित भाव, औद्योगिक विजेचा दर अन्य राज्यांशी स्पर्धात्मक ठेवणार, नीम अंतर्गत घेतलेल्या कामगारांना पूर्णवेळ कामगाराचा दर्जा.

- नव्या मोटार वाहन कायद्यान्वये आकारण्यात येणारा नवा दंड कमी करणार.

- जात पडताळणी व्यवस्था अधिक सुटसुटीत करणार.

- महिला गृह उद्योगांच्या मार्फत होणारी उत्पादने जीएसटीतून वगळणार,

- सच्चर कमिटीच्या शिफारशींची 100 टक्के अंमलबजावणी.

- एमएमआरडीए प्रमाणे इतर शहरांतही स्वतंत्र विकास प्राधिकरणे स्थापन करणार.

युवक काँग्रेसचा स्वतंत्र जाहीरनामा..

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने महाराष्ट्रातील तरुणांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात शिक्षण, रोजगार, आणि आरोग्य या मुद्द्यांवर प्रकाश टाकला गेला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे 'वेक अप महाराष्ट्र' या अभिनव उपक्रमाची आखणी करण्यात आली होती. याद्वारे विविध उपक्रम, स्पर्धा, माध्यमांद्वारे संपूर्ण राज्यातील सुमारे 3 कोटी युवकांनी उस्फुर्त सहभाग घेतला. हजारो युवकांनी यात बहुमूल्य सूचना दिल्या. या सर्व सूचनांवर चर्चा करून प्रभावी असा युवक जाहीरनामा 'महाराष्ट्र 4.0' बनविला गेला. खास युवकांसाठी बनविलेला देशातील हा पहिलाच जाहीरनामा आहे.

VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 04:02 PM IST

ताज्या बातम्या