मुंबईत बंद खोलीत चर्चा.. शरद पवारांकडून छगन भुजबळांची मनधरणी सुरू

मुंबईत बंद खोलीत चर्चा.. शरद पवारांकडून छगन भुजबळांची मनधरणी सुरू

छगन भुजबळ आणि समीर भुजबळ शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

  • Share this:

मुंबई,14 सप्टेंबर: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पुन्हा शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवार, छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. पवारांकडून भुजबळांची मनधरणी सुरू असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

राजा गेला.. प्रजा आमच्यासोबत..

छगन भुजबळ यांनी यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांबाबत शरद पवारांशी चर्चा झाली. कोणाचीही मनधरणी हिते राष्ट्रवादीकडून केली जात नाही आहे. ज्याला जायचे ते जातील दुसरा उमेदवार लढायला तयार आहे, राजा गेला.. तो जायला नव्हता पाहिजे, पण असो, प्रजा आमच्यासोबत आहे. सातारा आमचा किल्ला म्हणूनच राहील, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसैनिकांचे छगन भुजबळांना साकडं!

छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर नाशिकच्या काही सेना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला. मात्र दुसरीकडे छगन भुजबळ त्यांच्या येवला मतदारसंघातील शिवसैनिकांनी त्यांना पक्षात येण्यासाठी साकडं घातलं. भुजबळ हे विंचूर भागात विकास कामांच्या उद्घाटनांसाठी आले असता येवला मतदारसंघातील असंख्य शिवसैनिकांनी कार्यक्रमाच्या स्थळी येऊन त्यांची भेट घेतली व त्यांनी सेनेत लवकरात लवकर प्रवेश करावा यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. भुजबळांना भगवी शाल देऊन साकडेही घातले. छगन भुजबळांनी मात्र कार्यकर्त्या सोबत फक्त हस्तांदोलन केलं. प्रवेशा बाबत मात्र त्यांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही. शिवसैनिकांची ही कृती बोलकी असून भुजबळांच्या मौनात मोठा अर्थ दडलेला असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. छगन भुजबळ यांचा शिवसेना प्रवेश हा नक्की समजला जातोय. मात्र तो केव्हा होणार याबाबत वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत. भुजबळ हे पंकज आणि समीर यांच्यासह शिवसेनेत येतील असा अंदाज आहे. याबाबतही बोलणी पूर्ण झाली असल्याचीही चर्चा आहे.

सुप्रिया सुळेंच्या यात्रेला मारली दांडी

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या राज्याच्या 'संवाद' यात्रेवर होत्या. मरगळ आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणणं आणि पक्षाला लागलेली गळती रोखणं हा त्यांच्या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे. या यात्रेत त्या त्या जिल्ह्यातले पक्षाचे ज्येष्ठ नेते हजेरी लावत आहेत. मात्र ही यात्रा जेव्हा नाशिकमध्ये आली तेव्हा सुप्रियाताईंच्या सोबत पक्षाचे दिग्गज नेते छगन भुजबळ दिसले नाहीत. नाशिक हा भुजबळांचा बालेकिल्ला समजला जातो. गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीची नाशिकमधली एकहाती सत्ता ही भुजबळांच्या हातात होती. मात्र ते सध्या पक्षावर नाराज असल्याने त्यांनी संवाद यात्रेकडे पाठ फिरवत शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले होते.

दरम्यान, भुजबळ हे राष्ट्रवादीत नाराज असून त्यांना डावलण्यात येत असल्याची त्यांची भावना आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संवाद यात्रा नाशिकमध्ये आली असतानाही छगन भुजबळांनी त्याला दांडी मारली. त्यामुळे भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याचा कुणालाच थागपत्ता लागत नव्हता. या सगळ्या राजकीय चर्चेवर छगन यांनी दिलेली प्रतिक्रिया आणखीच बुचकळ्यात टाकणारी आहे. तुमच्या शिवसेना प्रवेशाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली असा थेट प्रश्न जेव्हा त्यांना विचारला तेव्हा ते म्हणाले मै यही हु, मै यही हु, मै यही हु. पण शिवसेना प्रवेशाच्या चर्चेचं खंडन मात्र त्यांनी केलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 03:57 PM IST

ताज्या बातम्या