शिवसेना-भाजप युतीचं या चार जागांवर अडलं घोडं, तोडगा निघताच होणार घोषणा

शिवसेना-भाजप युतीचं या चार जागांवर अडलं घोडं, तोडगा निघताच होणार घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली तरी शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून अजून वाटाघाटी सुरूच आहे.

  • Share this:

मुंबई,29 सप्टेंबर: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली तरी शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून अजून वाटाघाटी सुरूच आहे. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक संपली आहे. शिवसेनेने केलेली 126 जागांची मागणी भाजपने फेटाळली आहे. शिवसेनेला 124 जागा देण्याची तयारी भाजपने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने 126 जागांची मागणी फेटाळल्यानंतर आता शिवसेना काय भूमिका घेते, याकडे संगळ्यांचे लक्ष लागले आहेत.

चार जागांवर युतीचं अडलं घोडं..

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळी (वर्धा), सावनेर (नागपूर), माण- खटाव (सातारा) आणि बेलापूर (नवी मुंबई) या चार जागांवर युतीचं घोडं अडलं आहे. दोन्ही पक्षांमध्ये अद्याप वाटाघाटी सुरूच आहे. आता अंतिम टप्प्यात चर्चा सुरू असून तोडगा निघताच युतीची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या युतीची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपची पहिली यादी उद्या...

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात निर्विवादपणे जिंकण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. तसेच ज्या ठिकाणी दोन उमेदवार स्पर्धेत आहेत, अशा जागांची वेगवेगळी यादी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे. भाजपच्या परंपरागत 117 जागांवर प्रथम चर्चा करण्यात असल्याची माहिती समोर आली. भाजपची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेनेपाठोपाठ आता भाजपनेही संघटन मंत्र्यांना AB फॉर्मचे वाटप केले आहे. राज्यातील 6 विभागात 6 संघटन मंत्र्यांना AB फॉर्म घेऊन जाण्याचा पक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहे. यादी जाहीर होताच उमेदवारांना तासाभरात फॉर्म मिळावेत, यासाठी भाजपची व्यवस्था करण्यात आली आहे.

असे आहेत भाजपचे संघटन मंत्री..

मुंबई - सुनील कर्जतकर

कोकण- ठाणे - सतीश धोंडे

उत्तर महाराष्ट्र - किशोर काळकर

मराठवाडा - भाऊराव देशमुख

विदर्भ - उपेंद्र कोठेकर

पश्चिम महाराष्ट्र - रवींद्र अनासपुरे

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 11:35 PM IST

ताज्या बातम्या