भाजपच्या बंडखोर आमदाराने अखेर पक्षाला ठोकला रामराम, FB वर केला खुलासा

भाजपच्या बंडखोर आमदाराने अखेर पक्षाला ठोकला रामराम, FB वर केला खुलासा

विधानसभा निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झाली असताना कल्याणमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

कल्याण,11 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झाली असताना कल्याणमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील भाजपचे बंडखोर आमदार नरेंद्र पवार यांनी पक्षाला अखेर रामराम ठोकला आहे. नरेंद्र पवार 'शिट्टी' या चिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे पक्षाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी आपण भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नरेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्टवरुन जाहीर केले आहे.

शिवसेनेने कल्याण पश्चिम मतदारसंघाची जागा भाजपकडून मागून घेतली होती. या जागेवरुन आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. अखेर विश्वनाथ भोईर यांना शिवसेनेने तिकीट दिले. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी मैदानात आहेत. नरेंद्र पवार यांनी पक्षाने कारवाई करण्यापूर्वीच बाहेर पडणे पसंत केल्याचे समजते.

FB वर खदखद बोलून दाखवली..

'आज खूप जड अंतःकरणाने एक कटू निर्णय मला घ्यावा लागतोय. महायुतीने विधानसभा जागावाटपात शिवसेनेला कल्याण पश्चिमची जागा सोडून माझ्यावर अन्याय केला आहे. यावरुन व्यथित होऊन मी 1 ऑक्टोबर 2019 रोजी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मी कल्याण पश्चिम विधानसभेतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत असल्याने पक्षाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी आज मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे. अशाप्रकारे मला भारतीय जनता पार्टीपासून दूर जावे लागेल, असा साधा विचारही कधी मनात आणला नव्हता. मात्र मी कदाचित कुठे कमी पडलो, मलाही कल्पना नाही. 2014 मध्ये युती नसताना भाजपच्या तिकीटावर मी कल्याण पश्चिम विधानसभा लढवली आणि जिंकून आलो. पक्षाने मला काम करण्याची संधी दिली तेव्हा मी कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन काम केलं. मी अविरतपणे काम करुनही आता विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमची जागा घटकपक्षाला सोडून माझ्यावर अन्याय केला आहे. ज्या भारतीय जनता पार्टीने मला घडवलं, वाढवलं आणि माझ्यातला जनसेवक जागृत ठेऊन सेवा करण्याची प्रेरणा दिली त्या पक्षाला माझ्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये, अशी माझी भूमिका आहे. काही निर्णय वाईट असतात मात्र ते घ्यावे लागतात. आज हा निर्णय घेताना मला मनापासून दु:ख होत आहे. काम करत असताना माझ्याकडून कोणी दुखावले गेले असेल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो', अशा शब्दात नरेंद्र पवारांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे.

भाजपने या बंडखोरांची केली हकालपट्टी..

अपक्ष उमेदवारी मागे घेण्यास सांगूनही अर्ज मागे न घेणाऱ्या बंडखोरांना भाजपने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मीरा भाईंदरच्या गीता जैन यांच्यासह चरण वाघमारे (तुमसर), बाळासाहेब ओव्हाळ (पिंपरी चिंचवड), दिलीप देशमुख (अहमदपूर, जि.लातूर) या उमेदवारांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.

VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 03:29 PM IST

ताज्या बातम्या