जितेंद्र आव्हाडांना दिलासा, मुस्लिम बहुल मतदारसंघातूनच MIM उमेदवाराची माघार

जितेंद्र आव्हाडांना दिलासा, मुस्लिम बहुल मतदारसंघातूनच MIM उमेदवाराची माघार

वंचित बहुजन आघाडीसोबतची युती फिसकटल्यानंतर एमआयएमने दलितांचे इतर पक्ष व विविध जातीतील नेत्यांना जोडून घेण्यास सुरुवात केली होती.

  • Share this:

ठाणे, 7 ऑक्टोबर: मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रभर ओळख असलेला आणि एमआयएम पक्षाने जोरदार दावेदारी केलेल्या कळवा मुंब्रा मतदारसंघात एमआयएम पक्षाचे उमेदवार बरकतउल्लाह अली हसन शेख यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांचं कळवा-मुंब्रा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे. बरकतउल्लाह अली हसन शेख यांनी उमेदवारी मागे घेऊन एक प्रकारे जितेंद्र आव्हाड यांना दिलासाच मिळाला आहे.

वंचित बहुजन आघाडीसोबतची युती फिसकटल्यानंतर एमआयएमने दलितांचे इतर पक्ष व विविध जातीतील नेत्यांना जोडून घेण्यास सुरुवात केली होती. पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनी स्वतः मुंब्रा कळवा मतदारसंघातून बरकतउल्लाह अली हसन शेख यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते मुंब्रात जोमाने कामाला लागले होते. मात्र, आज एमआयएम उमेदवार शेख यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेत सगळ्यांना धक्का दिला.

कळवा मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेच्या दीपाली सय्यद आणि एमआयएमचे शेख यांच्यात तिरंगी लढत होईल, असे बोलले जात होते. मात्र, आता एमआयएम उमेदवाराने माघार घेतल्याने आव्हाड आणि सय्यद यांच्यात आता जोरदार लढत होणार आहे. तर उमेदवाराने माघार घेतल्याने आता एमआयएमची भूमिका काय राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. एमआयएमचे जिल्हा प्रमुख रउफ लाला यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, 2014 च्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांनी तब्बल 1 लाख 18 हजारांपेक्षा जास्त, तर शिवसेना उमेदवार दशरथ पाटील यांना 38 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. 2014 ला या मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार तिसऱ्या आणि भाजपचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर होता. मुंब्रा-कळव्यातून जितेंद्र आव्हाड यांनी 2009 च्या निवडणुकीतही मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीकडूनही उमेदवार देण्यात आला आहे, शिवाय एमआयएमच्या उमेदवारामुळे मतविभाजनाचा धोका होता. पण आता जितेंद्र आव्हाड यांच्या मागील संकट दूर झाल्याची चर्चा आहे.

EXCLUSIVE:जे चाललं ते योग्य नाही, शरद पवारांची UNCUT मुलाखत

Published by: Sandip Parolekar
First published: October 7, 2019, 9:37 PM IST

ताज्या बातम्या