Home /News /mumbai /

चॉकलेट खाण्याच्या प्लॅनमुळे मित्र गमावला, मुंबईतील अपघातात धक्कादायक खुलासा

चॉकलेट खाण्याच्या प्लॅनमुळे मित्र गमावला, मुंबईतील अपघातात धक्कादायक खुलासा

मुंबईतील मरिन ड्राइव्ह इथं कारने बसला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जमखी झाला होता.

    मुंबई, 16 मे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कधीही न थांबणाऱ्या मुंबईलाही ब्रेक लागला. त्यातच राज्यात मुंबईत शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतील लॉकडाऊनचे निर्बंध आणखीनच कडक करण्यात आले. मात्र अशा स्थितीतही तरुणांनी केलेली बेपर्वाही एकाच्या जीवावर बेतली आहे. मुंबईतील मरिन ड्राइव्ह इथं कारने बसला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जमखी झाला होता. या अपघात प्रकरणात आता धक्कादायक खुलासा झाला आहे. चॉकलेट खाण्यासाठी पाच मित्र एकत्र जमले होते. त्यानंतर हे सर्वजण घरी परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत 'लोकमत'ने वृत्त दिलं आहे. नेमकं काय घडलं? लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून घरी अडकलेल्या पाच मित्रांनी चॉकलेट खाण्यासाठी एकत्र यायचं ठरवलं. त्यानंतर ते पाच जण तीन कारमधून मरिन ड्राइव्ह इथं जमले. सर्व मित्र अनेक दिवसांनी एकत्र आल्यामुळे गप्पा-गोष्टी रंगल्या. नंतर ठरल्याप्रमाण चॉकलेटही खाऊन झालं. मात्र त्यानंतर घरी परतत असताना रिकामा रस्ता पाहून या मित्रांमध्ये रेस सुरू झाली. याच रेसवेळी नियंत्रण सुटल्याने एक कार थेट समोरून जात असलेल्या बसवर आदळली. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती आता चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन मित्रांविरोधात भरधाव वेगात गाडी चालवणे, रोगाचा प्रादुर्भाव होईल असे कृत करणे, यासारखे गुन्हे दाखल केले आहेत. तसंच पुढील तपास सुरू आहे. संपादन, संकलन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या