मुंबई, 24 फेब्रुवारी : गेला आठवडाभर मुंबईत सातत्याने रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळेच सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. प्रत्येक बोर्डासाठी सेंटर सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. गरज भासल्यास जम्बो कोविड सेंटरही सुरू केले जातील, अशीही सूचना देण्यात आली आहे. दरम्यान मुंबईतील कार्यालयांबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या ड्यूटीबाबत बदल करण्यात आले असून यापुढे केवळ 50 टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीसाठी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकांणी उपस्थित होते. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे 24 सप्टेंबर 2020 मध्ये जी व्यवस्था होती, तीच व्यवस्था पुन्हा सुसज्ज करण्यास सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा-फक्त 5 जिल्ह्यांनी वाढवलं टेन्शन; झपाट्याने वाढले राज्यातील कोरोना रुग्ण
त्याशिवाय महापालिका सहाय्यक आयुक्तांनी मुंबईतील सर्व सभागृहांमध्ये कोणकोणत्या तारखांना काय कार्यक्रम आहेत, याची माहिती मिळवून त्या कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तपासणी करणार असल्याचं सांगितलं आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कारवाई करता येईल. मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची 50 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात येणार आहे.
शिफ्टनुसार कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी बोलावण्यात येतील. सोबतच नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करणे आणि नियम न पाळणाऱ्या लोकांकडून दंड वसूल करणे हे नियम मुंबई महापालिकेकडून राबविण्यात येणार आहे. याशिवाय एखादा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करायचा की नाही याचा अधिकार त्या-त्या परिसरातील सहाय्यक आयुक्तांना देण्यात आलेले आहेत. ज्या परिसरात किंवा इमारतीत आजूबाजूला पाच रुग्ण आढळतील तो परिसर किंवा इमारत सील केली जाईल. मुंबईकरांनी येत्या काही दिवसात नियमांचे पालन केले नाही तर त्यांना लॉकडाऊनला सामोरे जावं लागणार आहे. पण हे पूर्णपणे मुंबईकरांवर अवलंबून आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकांणी यांनी दिली आहे.