मुंबई 09 एप्रिल : लॉकडाऊनमुळे कधीच न थांबणारी मुंबई थबकली आहे. या काळात हातावर पोट असणाऱ्यांना मोठा फटका बसलाय. दररोज मजुरी करून दोन पैसे मिळवायचे आणि पोट भरायचं अशी शेकडो लोकांची दिनचर्या होती. मात्र कोरोनामुळे सगळचं थंडावलं आहे. अशा गरीब आणि मोलमजुरी करणाऱ्यांना आता पोटासाठी दोन घासही मिळणं कठिण झालंय. अशा गरजुंसाठी आता सामाजिक संघटना पुढे येत आहेत. मुंबईतल्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्वामीनारायण मंदिर समितीने (BAPS) त्यासाठी पुढाकार घेतला असून अशा गरजुंना दररोज अन्नधान्य आणि भाजीपाला स्वामीनारायण ट्रस्टकडून पुरवला जातो. त्यासाठी 300 स्वयंसेवक गेल्या 15 दिवसांपासून झटत असून आत्तापर्यंत त्यांनी 800 क्विंटल अन्नधान्याचं वाटप केलंय.
मुंबईतल्या गरीब वस्त्या, झोपडपट्टी आणि सोसायट्यांमध्ये हे स्वयंसेवक गाड्या घेऊन जातात आणि त्यांना धान्याच्या किटचं वाटप करतात. मंदिराच्या परिसरात असलेल्या हॉलमध्ये हे सगळं सामान पिशव्यांमध्ये पॅक केलं जातं. त्यासाठी हे स्वयंसेवक झटत आहे. सोशल डिस्टंन्सिंग आणि स्वच्छतेची पुरेपूर काळजी त्यासाठी घेतली जात असल्याचं स्वामी तिर्थस्वरूप महाराज यांनी सांगितलं. 'मानव सेवा हीच माधव सेवा आहे' असंही त्यांनी सांगितलं.
दाळ, तांदूळ, पिठ, मसाले, तेल, कडधान्य, ताजा भाजीपाला, फळे असं जे आवश्यक आहे आणि उपलब्ध आहे ते सगळं मंदिराच्या प्रांगणात गोळा केलं जातं आणि त्याचं पॅकिंग करून ते दररोज विविध भागात जाऊन वाटलं जातं. गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेत प्रफ्फुल पटेल यांनी या सेवाकार्याची नुकतीच पाहणी केली आणि कामाचं कौतुकही केलं. गेल्या 15 दिवसांपासून हा उपक्रम सुरू असून आणखी काही काळ तो सुरू राहणार आहे.
BAPS तर्फे फक्त मुंबई आणि महाराष्ट्रातच नाही तर सर्व देशभर हे सेवाकार्य सुरू असल्याची माहितीही स्वामी तिर्थस्वरूप महाराज यांनी दिली.