मुंबई, 29 जून : कोरोनाचा धोका कायम असल्यानं राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 जुलैपर्यंत टप्याटप्याने शिथिलता दिली जाणार आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत दिलेल्या शिथिलताही सुरू राहतील. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्यास संबंधित जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त अनावश्यक सेवांवर ठराविक भागात निर्बंध घालू शकतात.
एमएमआर परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांना दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल, मात्र दूर जाता येणार नाही.
कुठल्या भागात असणार कडक लॉकडाऊन?
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागात कोरोनाचा वेगाने फैलाव सुरू झाला. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांपासून जिथं आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला नव्हता अशा ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे अधिक कोरोना रूग्ण असलेल्या मुंबईसह एमएमआर परिसरात तसंच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक,धुळे,जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिका परिसरात अधिक निर्बंध असणार आहेत.
देशातील स्थिती चिंताजनक
कोरोना रुग्णांची वाढती संख्या काही थांबवण्याचं नाव घेत नाही आहे. दर दिवशी कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी समोर येत आहे. देशात कोरोनाची एकूण संख्या 5 लाख 48 हजार 318 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,459 नवीन रुग्ण आढळले आणि 380 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सलग दुसर्या दिवशी कोरोनाची जवळपास 20 हजार प्रकरणं समोर आली आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 2 लाख 10 हजार 120 अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनामधून आतापर्यंत 16 हजार 475 रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर 3 लाख 21 हजार 722 रूग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown