News18 Lokmat

नायडू म्हणतात, 'कर्जमाफी मागणं ही फॅशन झालीये'

पैशांची गरज आहे तर बँकेकडून कर्ज घ्या, पण आज कर्जमाफ करण्याची फॅशनच झालीये असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंनी केलं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2017 07:34 PM IST

नायडू म्हणतात, 'कर्जमाफी मागणं ही फॅशन झालीये'

22 जून : पैशांची गरज आहे तर बँकेकडून कर्ज घ्या, पण आज कर्जमाफ करण्याची फॅशनच झालीये असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंनी केलं. ते एवढ्यावर थांबले नाहीतर एसबीआय बँकेत असणार पैसा हा काय अरुंधती राॅय यांचा आहे का ? तो आपलाच पैसा आहे असंही नायडू म्हणाले.

शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी मिळालेली नसताना राज्यकर्त्यांची ही अशी उपकाराची भाषा सुरू झालीये. कर्जमाफी दिली म्हणजे शेतकऱ्यांवर उपकारच केले अशी देहबोली भाजप सरकारमधील मंत्र्यांची आहे. लोकांना फुकट मागण्याची आणि नेत्यांना फुकट देण्याची सवय लागल्याचं  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कल्याणमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंनी शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागणं ही फॅशन झाल्याचं सांगून टाकलं.

नायडू एवढ्यावरच थांबले नाही. तर कर्जमाफीला विरोध करणाऱ्या एसबीआयच्या चेअरमन अरुंधती राॅय यांचीही पाठराखण केली. एसबीआय बँकेत असणारा पैसा हा काय अरुंधती राॅय यांचा आहे का ?, हा पैसा आमचा तुमचा आहे. जर कर्जमाफ करायचं असेल तर यावर अंतिम तोडगा हवाय असंही नायडू म्हणाले.

कर्जमाफी मागणं ही फॅशन असेल तर विरोधात असताना तुम्हीच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करत होता हे आठवतं का?.. उत्पादनखर्चापेक्षा पन्नासटक्के जास्त शेतमालाला भाव देऊ हे तुम्हीच सांगत होता ना?. शिवसेनेसह विरोधकांनी व्यंकय्या नायडूंच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय.

आज कांदा सव्वा रुपये किलो, तूर 3 हजार रुपये क्विंटल,डाळिंब चार रुपये किलो अशा भावानं विकला जातोय. शेतमालाच्या किंमती पडलेल्या असताना कसा शेतकरी उभा राहील? शेतकऱ्यांना सक्षम करण्याची जबाबदारी सरकारची नाही का?.. असा सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जातोय. अगोदर शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी काहीतरी करा नंतर राज्यकर्त्यांनी उपकाराची भाषा करणं योग्य ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2017 07:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...