मुंबई, 14 जून : घर बसल्या शिकाऊ वाहन चालक परवान्यासाठी (Learning licenses) चाचणी तसेच नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी वितरकाकडून ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी परिवहन विभागातर्फे ‘सारथी 4.0’ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे ई-लोकार्पण मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यासाठी आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. यामुळे आता शिकाऊ वाहनचालक परवाना (Learning licenses online), तसेच नवीन वाहनांची नोंदणी करणे अधिक जलद व सोयीस्कर होणार आहे. आगामी काळातही, राज्याच्या परिवहन विभागाच्या ज्या शासकीय सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देता येईल, त्या उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे, परिवहन विभागाच्या सेवा जास्तीत जास्त प्रमाणात लोकाभिमुख व पारदर्शक होणार आहे, असे मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
खर्चात बचत, कामाचा ताणही कमी
राज्यात दरवर्षी सुमारे 15 लाखापेक्षा जास्त शिकाऊ परवाने देण्यात येतात तसेच 20 लाखाहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी होते. या कामी नागरिकांचा अंदाजे 100 कोटी रुपयांचा खर्च होतो. आता या सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याने खर्चात बचत होऊन नागरिकांचा वेळ व श्रमही वाचणार आहे. तसेच हे काम करणाऱ्या अंदाजे 200 अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत झाल्याने विभागाच्या कामाची दर्जोन्नती करणेही यातून शक्य होईल.
शिकाऊ वाहन चालक परवाना आणि नवीन खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन परिवहन विभागाने आज जनहिताचे एक महत्वाकांक्षी पाऊल टाकले असून भविष्यातही शासकीय विभागांना ज्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देणे शक्य आहे त्या उपलब्ध करून देण्यासाठी ई गव्हर्नन्सवर आधारित नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
“सारथी 4.0” या अद्ययावत प्रणालीअंतर्गत आधार क्रमांकांशी संलग्न असलेल्या ऑनलाईन शिकाऊ वाहन चालक परवाना तसेच वाहन नोंदणीच्या ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
हे वाचा - स्वस्तात घर खरेदीची संधी; PNB कडून होणार 12865 घरं आणि अॅग्रीकल्चर प्रापर्टीची विक्री, पाहा डिटेल्स
शिकाऊ वाहन परवाना मिळवण्यासाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही. नवीन वाहन नोंदणीकरिता यापूर्वी वाहनांची तपासणी मोटार वाहन निरीक्षकांमार्फत करण्यात येत होती आता अशा पद्धतीने वाहन तपासण्याची आवश्यकता काढून टाकण्यात आली असून यापुढे नवीन वाहनांची वितरकाच्या स्तरावर तत्काळ नोंदणी होईल. वाहन वितरकांमार्फत सर्व कागदपत्रे डीएससी (डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट) चा उपयोग करुन ई स्वाक्षरी पद्धतीने तयार करण्यात येतील त्यामुळे कार्यालयात वाहन अथवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. वाहन वितरकांनी कर व शुल्क भरल्याक्षणी वाहन क्रमांक जारी होणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Driving license, Uddhav tahckeray