Home /News /mumbai /

ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहा, सेनेचा मोदींना टोला

ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहा, सेनेचा मोदींना टोला

'भाजप पुढारी व राज्यकर्ते ‘नमस्ते ट्रम्प’साठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करीत होते. ट्रम्प यांना ऐन ‘कोरोना’ काळात गुजरातमध्ये आमंत्रित करून सरकारी खर्चाने प्रचार केला'

    मुंबई, 09 नोव्हेंबर : 'लोकशाहीत जय आणि पराभव हे नम्रपणे स्वीकारायचे असतात, लोकांचे आभार मानायचे असतात, पण या नम्रपणाचे कोणतेही संस्कार नसलेल्या ट्रम्प (donald trump) यांनी लोकांचा कौल ठोकरून जे तांडव सुरू केले आहे, ते कृत्य भयंकर आहे. अशा ट्रम्पसाठी आपल्या देशात स्वागताच्या पायघड्या घातल्या गेल्या, हे विसरता येणार नाही. चुकीच्या माणसांच्या मागे उभे राहणे ही आपली संस्कृती नाही, पण तसे पायंडे पाडले जात आहेत. ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहावे' असा सल्लावजा टोला शिवसेनेने (Shivsena) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना लगावला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत जो बायडन यांनी  डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवावर शिवसेनेनं मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहे. 'आपल्याशिवाय देशाला किंवा राज्याला पर्याय नाही, या भ्रमातून नेत्यांना बाहेर काढण्याचे काम लोकांनाच करायचे असते. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी कधीच लायक नव्हते. त्यांच्या माकडचेष्टा व थापेबाजीस अमेरिकेची जनता भुलली, पण त्याच ट्रम्प यांच्याबाबत केलेली चूक अमेरिकन जनतेने फक्त चार वर्षांत सुधारली. त्याबद्दल तेथील जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. ट्रम्प यांनी सत्तेवर येण्यासाठी थापांचा पाऊसच पाडला. एकही आश्वासन, वचन ते पूर्ण करू शकले नाहीत. अमेरिकेत आज बेरोजगारीची महामारी कोरोनापेक्षा भारी आहे, पण त्यावर उपाय करण्यापेक्षा ट्रम्प फालतू विनोद, माकडचेष्टा व राजकीय लफंगेगिरीलाच महत्त्व देत आले. शेवटी लोकांनी त्यांना घरी पाठवले.  इतकेच नव्हे तर आपल्या भाडोत्री समर्थकांना बंदुका घेऊन रस्त्यावर उतरवले, हिंसाचार घडवला. अशा माणसाच्या हाती अमेरिकेची सूत्रे चार वर्षे होती व भारतातील भाजप पुढारी व राज्यकर्ते ‘नमस्ते ट्रम्प’साठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करीत होते. ट्रम्प यांना ऐन ‘कोरोना’ काळात गुजरातमध्ये आमंत्रित करून सरकारी खर्चाने प्रचार केला व त्यातूनच कोरोनाचे संक्रमण पसरले, हे नाकारता येणार नाही' असं म्हणत सेनेनं पंतप्रधान मोदींना टोला लगावला. 'ट्रम्प यांचे सध्याचे वर्तन म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा पद्धतीचे आहे. त्यामुळे आपल्या राष्ट्राची अप्रतिष्ठा होत असल्याचे त्यांच्या खिजगणतीतही नाही.  ट्रम्प यांचा पराभव म्हणजे माजोरडेपणाचा, पैशांच्या मस्तीचा पराभव आहे. हाती सत्ता, पैसा आणि टगे मंडळींची टोळी असली की, हवे ते साध्य करता येते या मस्तीचा पराभव आहे' अशी टीकाही सेनेनं केली. 'लोकशाहीत जय आणि पराभव हे नम्रपणे स्वीकारायचे असतात, लोकांचे आभार मानायचे असतात, पण या नम्रपणाचे कोणतेही संस्कार नसलेल्या ट्रम्प यांनी लोकांचा कौल ठोकरून जे तांडव सुरू केले आहे, ते कृत्य भयंकर आहे. अशा ट्रम्पसाठी आपल्या देशात स्वागताच्या पायघड्या घातल्या गेल्या, हे विसरता येणार नाही. चुकीच्या माणसांच्या मागे उभे राहणे ही आपली संस्कृती नाही, पण तसे पायंडे पाडले जात आहेत. ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहावे इतकेच आता म्हणता येईल' असा सल्लावजा टोला सेनेनं मोदी सरकारला लगावला आहे. 'जगातल्या प्रमुख लोकशाही राष्ट्रांत हिंदुस्थानबरोबर अमेरिकेचाही संदर्भ येतो, पण लोकशाहीचा लेप लावून काही लोक नौटंकी करीत असतात व ‘लोकशाहीचे बाप आपणच आहोत’, असा आव आणत असतात. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी भारती वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड झाली आहे. कमला हॅरिस यांची व्यक्तिगत पातळीवर निंदानालस्ती करण्याचा प्रकार ट्रम्प यांनी केला. एक महिला म्हणूनही कमला हॅरिस यांचा सन्मान राखण्याचे सौजन्य ट्रम्प यांनी दाखविले नाही व अशा ट्रम्प यांचे सगळ्यात मोठे पाठीराखे म्हणजे पंतप्रधान मोदी व भाजपवाले होते. आता हिंदुस्थानी वंशाच्या कमलाबाई अमेरिकेच्या उपराष्ट्रपती झाल्याचा आनंद जगभरातील भाजपाईंना झाला असेल तर ते ढोंग आहे. कारण या कमला हॅरिस यांच्याबाबत सोशल मीडियावरून अपप्रचार करण्यात भाजपाई मंडळीच आघाडीवर होती. आता जर तेच हॅरिस बाईंच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करीत असतील तर हा ‘ट्रम्प’छाप विनोद म्हणावा लागेल' असा टोलाही सेनेनं भाजपला लगावला. भारताने ‘नमस्ते ट्रम्प’ केले असले तरी अमेरिकेच्या सुज्ञ जनतेने ट्रम्प यांना ‘बाय बाय’ करून चूक सुधारली. भारतातील बिहारातही तसेच सत्तांतर होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. पंतप्रधान मोदींसह नितीशकुमार वगैरे नेते तरण्याबांड तेजस्वी यादवसमोर टिकाव धरू शकले नाहीत. खोटेपणाचे फुगे हवेत सोडले, ते हवेतच गायब झाले. लोकांनीच बिहारची निवडणूक हाती घेतली. त्यांनी पंतप्रधान मोदी, नितीशकुमार यांना जुमानले नाही. तेजस्वीच्या सभांतून लाटा उसळत होत्या व पंतप्रधान मोदी, नितीशकुमारसारखे नेते निर्जीव मडक्यांसमोर घसे फोडत असल्याचे चित्र देशाने पाहिले. बिहारात पुन्हा जंगलराज येईल अशी भीती दाखविण्यात आली, पण लोकांनी बहुधा स्पष्टच सांगितले, ‘‘आधी तुम्ही जा, जंगलराज आलेच तर आम्ही निपटून टाकू!’’ अमेरिका व बिहारातील जनतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच! जनता हीच श्रेष्ठ व सर्वशक्तिमान आहे' असंही सेनेनं ठणकावून सांगितले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Donald Trump, Narendra modi

    पुढील बातम्या