मुंबई, 20 ऑक्टोबर: गेली दोन-तीन दिवस विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यानंतर आता राज्यात पावसानं उघडीप घेतली आहे. त्यामुळे राज्यातील किमान आणि कमाल तापमानात काही प्रमाणात चढ उतार जाणवत आहेत. आज राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पण राज्यात कुठेही पावसाचा इशारा देण्यात आला नाही. राज्यात सर्वदूर कोरडं हवामान राहणार आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे भारतात मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रभावामुळे दक्षिण भारत आणि ईशान्यकडील काही राज्यात अद्याप मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. पुढील एक ते दोन दिवसांत येथून मान्सून पूर्णपणे परतण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाग वगळता महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे परतला आहे.
हेही वाचा-या देशातही कोरोनाचा विस्फोट; आता 1 महिन्याचा लॉकडाऊन लावावाच लागला, स्थिती बिकट
आजपासून पुढील पाच दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात सर्वदूर कोणताही इशारा दिला नाही. मान्सून परत जाताच राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात किंचितशी वाढ झाली आहे. तर पहाटे हवेत गारवा जाणवत आहे.
हेही वाचा-कोव्हॅक्सिनला अजूनही जागतिक मंजुरीची प्रतीक्षा; आता WHO नं मागितली ही माहिती
दुसरीकडे, दक्षिण भारत आणि ईशान्यकडील राज्यात आज अनेक ठिकाणी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. येत्या चोवीस तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. खरंतर, सध्या बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा परिसरावर तयार झालेलं हवेच्या कमी दाब क्षेत्र बिहारकडे सरकलं आहे. तर उत्तर प्रदेश आणि आसपासच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर भारतातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather forecast, महाराष्ट्र