प्रसिद्ध ब्रँडच्या मसाल्यात सापडल्या जीवंत अळ्या; ग्राहकाची व्हिडिओ दाखवित तक्रार

प्रसिद्ध ब्रँडच्या मसाल्यात सापडल्या जीवंत अळ्या; ग्राहकाची व्हिडिओ दाखवित तक्रार

महत्वाची बाब म्हणजे या मसाल्याची वैद्यता संपायला तीन महिने शिल्लक असताना त्यात अळ्या आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

  • Share this:

उल्हासनगर, 2 एप्रिल : उल्हासनगरमधील एका व्यक्तीने प्रसिद्ध मसाल्याच्या ब्रँडविरोधात तक्रार केली आहे. या प्रसिद्ध कंपनीच्या सब्जी मसाल्यात अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्वाची बाब म्हणजे या मसाल्याची वैध्यता संपायला तीन महिने शिल्लक असताना त्यात अळ्या आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कॅम्प नंबर तीनच्या एका दुकानातून हा मसाला खरेदी केला होता. गुरुवारी त्यांच्या पत्नीने भाजी करण्यासाठी या मसाल्याचे पॅकेट फोडल्यावर यात अळ्या आढळल्या. या प्रकरणी त्यांनी तत्सम ब्रँडच्या कस्टमर केअरकडे तक्रार केली आहे.

उल्हासनगर कॅम्प 3 च्या ओटी सेक्शन भागात सुरेश चौहान आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांनी घराशेजारी असलेल्या दिनेश किराणा स्टोअर्समधील प्रसिद्ध ब्रँडचा सब्जी मसाला विकत आणला. गुरुवारी रात्री त्यांची पत्नी आरती स्वयंपाक करीत असताना मसाल्याचे पॅकेट उघडून वाटीत टाकले. त्याच वेळी मसाल्यात काही तरी वळ वळ करत असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी लक्ष देऊन पाहिल्यावर त्यात त्यांना अनेक अळ्या आढळल्या. त्यांनी लगेच ही बाब पती सुरेश यांना सांगितली. सुरेश यांनी मोबाइलमध्ये व्हिडिओ केला आणि तो कंपनीच्या कस्टमर केअरला मेलद्वारे पाठवत तक्रार केली.

हे ही वाचा-अरे देवा! कोरोनानंतर आता अज्ञात आजाराची दहशत; 5 जणांचा घेतला जीव

कस्टमर केअरने देखील याची तत्काळ दखल घेत त्यांना फोन करून या सर्व प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कस्टमर केअरच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी आरोप फेटाळले आहेत. मसाल्याचे पॅकेट ठेवण्याची जागा चुकीची असल्यास असे होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय या मसाल्याची पॅकिंग ज्या दिवशी झाली आहे, त्या बॅचचे नमुने आम्ही तपासले असता त्या मसाल्यात असे काहीच नाही असे ही कस्टमर केअरने सांगितले आहे. या मसाल्याच्या पॅकेटची पॅकिंगची तारीख 12 मार्च 2020 आहे. तसेच त्याची वैधता ही 15 महिन्यांची आहे. याचाच अर्थ वैद्यता संपण्यासाठी 3 महिने शिल्लक असतांना मसाल्यात अळ्या कशा आल्या, असा सवाल सुरेश चौहान यांनी उपस्थित केला आहे. मसाल्याचे उत्पादन करणाऱ्या एवढ्या मोठ्या कंपनीने कोणाच्या आरोग्याशी न खेळता भविष्यात काळजी घ्यावी अशी विनंती चौहान यांनी केली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: April 2, 2021, 7:17 PM IST

ताज्या बातम्या