अमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, सासूने डोक्यात घातला फ्लॉवर पॉट

अमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, सासूने डोक्यात घातला फ्लॉवर पॉट

एकदा नव्हे तर सासूने सूनेच्या डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार केले.

  • Share this:

वसई,15 डिसेंबर: अमेरिकेहून आलेल्या सूनेची सासूनेच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सून झोपेत असताना सासूने तिच्या डोक्यात फ्लॉवर पॉट घातला. एकदा नव्हे तर सासूने सूनेच्या डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार केले. हत्येनंतर सासूने स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हत्येची कबूली दिली. माणिकपूर पोलिसांनी आरोपी सासूला अटक केली आहे. रिया माने (वय-32) असे हत्या झालेल्या सूनेचे तर आनंदी माने (वय-48) असे आरोपी सासूचे नाव आहे. रिया ही नर्स होती.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसई पश्चिमेला ओमनगरमधील इस्कॉन हाईट्स या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रविवारी सकाळी आठ ते नऊ वाजता ही घटना घडली. रिया आपल्या बेडरुममध्ये झोपली असताना सासू आनंदीने तिच्या डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार केले. रियाचा जागेवरच मृत्यू झाला. हत्यानंतर सासू स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाली. पोलिसांनी घटनास्थळावरुन मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवला आहे.

वसई पश्चिमेला ओमनगरमधील इस्कॉन हाईट्सच्या चौथ्या मजल्यावर फ्लॅट नंबर 401 मध्ये उच्चशिक्षित माने कुटुंब राहते. दत्तात्रय माने हे वनविभागात नोकरीला होते. त्यांना दोन मुले आहेत. दोन्ही मुले उच्चशिक्षित आहेत. रिया ही माने यांचा मोठा मुलगा रोहनची पत्नी होती. रोहन हा इंजिनिअर आहे. रोहन आणि रिया यांना सहा महिन्यांची मुलगीही आहे.

आई-वडिलांना भेटण्यासाठी होते वसईत..

रोहन आणि रिया 2013 पासून नोकरीनिमित्त अमेरिकेत राहत होते. एक डिसेंबरला दोघे आई-वडिलांना भेटण्यासाठी वसईत आले होते. रोहनच्या लग्नापासूनच त्याची पत्नी रिया आई आनंदी मानेला आवडत नसल्याची माहिती रियाच्या नातेवाईकांनी दिली आहे. लग्नाच्या नंतर आपला मुलगा पत्नीच्या आहारी जाऊन आपल्यापासून दुरावला आहे, याचं दुःख आरोपी सासूच्या मनात खदखदत होती. दोन दिवसांपूर्वी रोहनची मुलगी घेण्यावरुन सासू-सुनेत किरकोळ वाद झाला होता. याच रागातून सासूने सूनेची हत्या केली.

ही संधी साधून सासूने केली सूनेची हत्या...

रविवारी सकाळी रोहन, त्याचे वडील आणि सहा महिन्यांच्या मुलीला घेऊन फिरायला गेले होते. घरात लहान मुलगा आणि त्याची पत्नी एका रुममध्ये, तर रोहनची पत्नी रिया ही दुसऱ्या रुममध्ये झोपलेली होती. याचीच संधी साधून आरोपी सासूने घरातील फ्लॉवर पॉट घेऊन झोपेत असलेल्या रियाच्या डोक्यात आठ सपासप वार करून तिची हत्या केली. हत्येनंतर सासूने स्वतःच पोलिस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली. पण हत्येनंतर आपणही आत्महत्या करण्यासाठी झोपेच्या गोळ्या खाल्ल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तिचीही तात्काळ वैद्यकीय तपासणी केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2019 08:30 PM IST

ताज्या बातम्या