मुंबई, 22 फेब्रुवारी : मुंबईतील उत्तर भारतीय दिग्गज नेते कृपाशंकर सिंह हे गेल्या काही काळापासून राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून दूर आहेत. शहरातील काँग्रेसचे बलाढ्य नेते अशी त्यांची ओळख होती. मात्र ते आता काँग्रेसपासून दूर झाले असून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं. याच कृपाशंकर सिंह यांनी रविवारी ‘परिश्रम‘ संकल्प यात्रेची सुरुवात केली आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरांमधील सांताक्रुज वाकोला परिसरात त्यांनी या यात्रेची सुरुवात केलेली आहे. या यात्रेदरम्यान अधिकाधिक उत्तर भारतीय लोकांशी संपर्क साधण्याचा कृपाशंकर सिंग यांचा प्रयत्न आहे.
उत्तर भारतीय लोक म्हणजे मेहनत असं समीकरण आहे आणि त्या लोकांना भेटण्यासाठी आपण ही संकल्प यात्रा सुरू केली आहे असं कृपाशंकर सिंह यांनी म्हटलं आहे. मुंबईच्या जडणघडणीत उत्तर भारतीयांचं मोठे योगदान आहे आणि त्याबद्दलच या उत्तर भारतीय कामगारांची, मजुरांची भेट घेण्यासाठी आपण ही संकल्प यात्रा सुरू केली आहे, असा कृपाशंकर सिंग यांचा दावा आहे.
खरंतर यानिमित्ताने मुंबई आणि आसपासच्या परिसरातील उत्तर भारतीयांपर्यंत पोहोचून आपलं राजकीय महत्त्व वाढवण्याचा कृपाशंकर सिंह प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जातं आहे. विशेषत: पुढील वर्षी होई घातलेल्या मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकांमध्ये उत्तर भारतीयांच्या मतदानाचा टक्का महत्त्वाचा आहे आणि त्यात आपली भूमिका महत्त्वाची आहे असं कृपाशंकर या यात्रेद्वारे राजकीय पक्षांना सांगू पाहात असल्याची चर्चा आहे. मात्र या यात्रेकडे राजकीयदृष्ट्या पाहू नये असं कृपाशंकर सिंग यांचं म्हणणं आहे.
हेही वाचा - काँग्रेसच्या मोर्चेबांधणीला जोर, राज्यात पक्षाला पुन्हा 'अच्छे दिन' आणण्यासाठी आखली मोहीम!
या यात्रेमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस असे वेगवेगळ्या पक्षांचे पण उत्तर भारतीय समाजाशी संबंधित असलेले लोक सहभागी झाले असा दावा कृपाशंकर सिंग यांनी केलेला आहे. यात केवळ उत्तर भारतीय कामगारांनी ज्या पद्धतीने कोरोना आणि एरवीदेखील मुंबईच्या जडणघडणीत जे योगदान दिले आहे त्याची नोंद घेऊन या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांची भेटण्याचा प्रयत्न आहे असा दावा कृपाशंकर सिंग करत आहेत.
कोरोना काळात किती लोक मुंबई बाहेर गेले किती लोक पुन्हा मुंबईत घेऊ शकले आहेत त्यांची नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे याची माहिती आपण या यात्रेद्वारे घेत असल्याचं कृपाशंकर सिंग म्हणतायंत.
कृपाशंकर सिंह यांची पुढील राजकीय दिशा काय असणार?
खरंतर गेल्या काही वर्षांपासून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा कृपाशंकर सिंग यांचा प्रयत्न आहेत. मात्र त्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. ते गेल्या काही वर्षांपासून ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा कायम असते. अगदी काही दिवसांपूर्वी त्यांनी सिंधुदूर्गात जाऊन भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि मुंबईत ते करू पाहत असलेल्या उत्तर भारतीयांच्या एक लाखांच्या मेळाव्याला अमित शहा यांनी यावं असं त्यांनी निमंत्रण देखील दिलेलं आहे.
अर्थात सध्याच्या काळात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढलेली असताना असा मेळावा घेणे शक्य नाही, पण तोपर्यंत आपला जनसंपर्क वाढावा यासाठी कृपाशंकर हे आता मैदानात उतरले आहेत. मुंबईतील मेहनती हिंदी भाषिकांची गोष्ट लोकांना सांगून हा विषय
लोकांना प्रेरणादायी व्हावा याकरता आपण या संकल्पयात्रे द्वारे प्रयत्न करणार आहेत असे देखील कृपाशंकर सिंग यांनी म्हटलेलं आहे.
या सगळ्या भेटी-गाठींद्वारे कृपाशंकर सिंह हे पुन्हा आपलं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात त्याला किती राजकीय यश मिळतं ते येणारा काळच ठरवेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.