मुंबई , 4 फेब्रुवारी : काही व्यक्तींचे आपले काम आणि आपण एवढेच विश्व असते. मात्र, काही माणसे आपले कर्तव्य सांभाळत वेगळ्या वाटा निवडतात. आपल्या आयुष्याचे ध्येय निर्धारित करतात. अशीच एक व्यक्ती मुंबईतील आर्थर रोड परिसरात राहते. गेल्या 55 वर्षांपासून ते बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांचे अस्थिविसर्जन धर्मपरंपरांप्रमाणे करतात. त्यांनी आतापर्यंत तब्बल 5 हजाराहून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
कशी झाली सुरुवात?
किशोर भट्ट हे वयाच्या 16 व्या वर्षापासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत आहेत. आता किशोर भट्ट हे 71 वर्षांचे आहेत. 1968 पासून या कार्याला त्यांनी सुरुवात केली. यामध्ये किशोर भट्ट हे जात धर्म भाषा बघत नाहीत. तसेच मृतदेहांवर अंत्यसंस्कार हे धर्मपरंपरांप्रमाणे करतात. हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती अश्या सर्व जाती धर्मातील व्यक्तीवर ते त्यांच्या प्रथे प्रमाणे अंत्यविधी करतात. सद्गती संस्थे मार्फत हे समाज कार्य सुरू आहे. किशोर भट्ट यांच्याकडे या कामासाठी दोन रुग्णवाहिका देखील आहेत.
किशोर भट्ट सांगतात की, मुंबईमध्ये बाहेर गावातून अनेक लोक कामासाठी येत असतात. मात्र, ते आजारी पडल्यानंतर त्यांची कुटुंबीय त्यांना रुग्णालयात भरती करतात. त्यानंतर जर त्या रुग्णाचा मृत्यू झाला की त्यांच्याकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नसतात. अशावेळी ते मृतदेह स्वीकारण्यासाठी तयार नसतात. अशावेळी रुग्णालयातून मला संपर्क केला जातो आणि सर्व परिस्थिती सांगितली जाते. त्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना भेटल्यानंतर त्यांना मृतदेह जर त्यांच्या राहत्या घरी घेऊन जायचं आहे का अशी विचारणा केली जाते. जर त्यांना राहत्या घरी मृतदेह नायचा नसेल तर मुंबईतील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यासमोरच अंत्यसंस्कार केले जातात.
संपूर्ण खर्च स्वतः करतात
मुंबई पोलिसांकडे दोन तीन महिने असलेले बेवारस मृतदेहांवर देखील अंत्यसंस्कार करण्याचं काम किशोर भट्ट करतात. या अंत्यसंस्कारासाठी लागणारा संपूर्ण खर्च हे किशोर भट्ट स्वतः करतात. महत्त्वाचं म्हणजे किशोर भट्ट हे मोबाईल वापरत नाहीत. त्यांच्या मते जर व्यक्तीचा अंत्यसंस्कार करत असताना जर एखाद्याचा फोन आला आणि मी अंत्यविधी मध्ये असलो तर मला ती सोडून जाता येत नाही. त्यामुळे मी मोबाईल वापरत नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, दुकानांमध्ये लँडलाईन असून त्यावर लोकांशी संपर्क साधतो किंवा एखाद्या वेळेस कॉलर आयडी चेक करून अनेकांना पुन्हा संपर्क करून त्यांची विचारपूस करतो.
Social Barber : आठवड्यातील एक दिवस गरजूंची सेवा करणारा मुंबईकर, अनेकांचा आहे आधार Video
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
शिवडीच्या टीव्ही रुग्णालयात एच आय व्ही संक्रमित अनेक रुग्ण असतात. अशावेळी या रुग्णांना दाखल करताना त्यांचे कुटुंबीय आपला संपर्क क्रमांक देतात. मात्र, जेव्हा रुग्ण एच आय व्ही पॉझिटिव्ह असल्याचं कळतं तेव्हा नातेवाईक कुटुंबीय यायचं बंद करतात. व शेवटी रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांशी संपर्क साधल्यावर चुकीचा संपर्क झाल्याचे सांगून टाळाटाळ करतात. अशावेळी रुग्णालय संपर्क करतं त्यावेळी या रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जातात. 71 वर्षाच्या वयात देखील किशोर भट हे कोणत्याही मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला नकार देत नाहीत. किशोर भट्ट यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.