'अमृतावहिनींना आवरा, देवेंद्र फडणवीसांमुळेच सरकार आलं नाही'

'अमृतावहिनींना आवरा, देवेंद्र फडणवीसांमुळेच सरकार आलं नाही'

देवेंद्र आणि अमृता फडणवीस हे शिवसेनेवर ज्या प्रकारे टीका करत आहे, त्यामुळे हिंदू पक्ष दुरावत आहेत

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी : सत्तेतून पायउतार झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही शिवसेनेवर एकापाठोपाठ एक टीकास्त्र सोडलं. आता या प्रकरणी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी थेट संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांना पत्र लिहून दोघांना आवर घाला अशी विनंती केली आहे.

किशोर तिवारींनी  भैय्याजी जोशी यांना पत्रातून देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांना आवर घाला, अमृता यांचा राजकीय हस्तक्षेप थांबवा, अशी विनंती तिवारी यांनी केली. तसंच,  देवेंद्र आणि अमृता यांच्या उर्मटपणामुळे, शिवसेना आणि भाजपची युती होऊ शकली नाही, अशी नाराजीही त्यांनी या पत्रात व्यक्त केली.  तिवारी हे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आहेत.

देवेंद्र आणि अमृता फडणवीस हे शिवसेनेवर ज्या प्रकारे टीका करत आहे, त्यामुळे हिंदू पक्ष दुरावत आहेत. ते जवळ येणं आणखी कठीण होतं आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती होऊ शकली नाही आणि भाजपला सत्तेतून बाहेर पडावं लागलं. हे सगळं फडणवीसांच्या अरेरावीमुळे घडलंय, अशा शब्दात तिवारींनी तक्रार केली आहे.

तसंच, अमृता यांनी केलेले ट्वीट हे अशोभनिय आहे. त्यांचे असं वागणे हे भारतीय संस्कृतीत पती आणि पत्नीच्या नात्याला धक्का देणारं आहे. अमृता यांना भाजप पक्ष चालवायचा आहे का?  अशा तिखट सवालही त्यांनी विचारला. तसंच, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पत्नी कधी कुणावर टीका करत नाहीत, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

दरम्यान, 26 फेब्रुवारी रोजी पर्यटनमंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.  फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या वादात अमृता फडणवीस यांनी उडी घेत आदित्य यांच्यावर विखारी टीका केली होती.

शिवसेनेनं बांगड्या भरल्या असतील, पण भाजपनं नाही असं मंगळवारी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली होती. बांगड्या हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं होतं. आता अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटला रिट्वीट करून उत्तर दिलंय. 'कोषात वाढलेल्या रेशीम किड्याला आयुष्यातली मजा काय कळणार? पूर्वजांनी विणून ठेवलेल्या आयत्या वलयात गर्भरेशमी आयुष्य ते जगत असतात' अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

तसंच, देवेंद्र फडणवीस, तुमच्या संघर्षाचा मला अभिमान असून भाजपच्या प्रत्येक कार्यकर्ता हा कठोर परिश्रम करत आहे, असं कौतुकही त्यांनी केलं.

First published: February 27, 2020, 7:23 PM IST

ताज्या बातम्या