बदलापूर, 30 मे : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) हे अवघ्या दोन महिन्यांचे पाहुणे असल्याची टीका किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा केली आहे. अनिल परब यांच्या विरुद्ध अनेक घोटाळ्यांच्या चौकशी सुरू असल्याचा दावाही परब यांनी केला आहे. अनिल देशमुखांनंतर आता त्यांचाच नंबर लागणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले. तसंच राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं कोरोनाचे मृत्यू लपवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
(वाचा-सेलिब्रेटी लस प्रकरण; ठाणे मनपाकडून चौकशीचे आदेश, तीन दिवसांत येणार सत्य समोर)
किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर दहा वेगवेगळ्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचा आरोप केला आहे. एसटी महामंडळ तिकीट घोटाळा, म्हाडाची जमीन लंपास करणे, दापोलीला अनधिकृत 10 कोटींचा रिसॉर्ट बांधणे, आरटीओ ट्रान्सफर घोटाळा, सचिन वाझेचे मुंबई महापालिका कॉन्ट्रॅक्टर घोटाळा, भेंडी बाजारमधील मोठा री-डेव्हलपमेंट प्रकल्प 50 कोटींचा घोटाळा अशा अनेक चौकशी अनिल परब यांच्या विरोधात सुरू असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत.
नाशिक पोलीस, लोकयुक्तांकडं अनिल परब यांच्या तीन प्रकरणांची चौकशी सुरू आहे. तसंच सीबीआय, एसीबी, ईडी, एनआयए, अँटी करप्शनदेखिल या घोटाळ्यांची चौकशी करत आहेत. तसंच राज्यपालांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळं अनिल परब हे दोन महिन्यांचे पाहुणे असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
(वाचा-Alert! केरळात मान्सूनचं आगमन लांबणीवर; 24 तासांत पुण्यासह मुंबईत पूर्वमोसमी पाऊस)
राज्यातील महा विकास आघाडी सरकारला कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार करून पैसे कसे जमवायचे हेच माहिती आहे असा आरोप सोमय्यांनी केला. राज्यात कोविड काळात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले असताना ठाकरे सरकरा ते आकडे लपवत असल्याचा, गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मी स्वतः राज्यातील 13 महानगरांमध्ये जाऊन एप्रिल महिन्यात झालेल्या कोविड मृत्यूचे फॉरेन्सिक ऑडिट करणार आहे, असंही ते म्हणाले. एकट्या कोल्हापूर शहरात एप्रिल महिन्यात सोळाशे मृत्यू झालेले असतांना फक्त 400 मृत्यू दाखवण्यात आले, ही फसवणूक असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाला भाजपचा आणि मोदी सरकारचा पाठिंबा असून मोदी सरकार त्यासाठी पुन्हा न्यायालयात जाणार असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं. त्यामुळं या सर्व आरोपांना सरकारमधील नेते आणि प्रामुख्यानं अनिल परब आता काय उत्तर देणार याकंडं लक्ष लागलेलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, BJP, Maharashtra News