मुंबई, 8 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणापासून सुरू झालेला अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद विकोपाला जावून पोहोचला आहे. कंगनाकडून दररोज याच प्रकरणावरून राज्य सरकारसह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले जात आहेत, तर सत्ताधारी पक्षाचे नेतेही कंगनावर पलटवार करत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही कंगनावर निशाणा साधला आहे.
'कोरोना,बेकारी व आर्थिक संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी तू बोलत रहा,आम्ही तुला सुरक्षा पुरवू', अशी शंका मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा दिल्यामुळं येत आहे. म्हणून दिशाभूल करणाऱ्या अशा ड्रामेबाजांना महत्त्व न देता दुर्लक्ष केलेलंच चांगलं व ही सुरक्षा फुकट नसेल, अशी अपेक्षा,' असं ट्वीट करत रोहित पवार यांनी कंगनासह भाजपवर निशाणा साधला आहे.
'कोरोना,बेकारी व आर्थिक संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी तू बोलत रहा,आम्ही तुला सुरक्षा पुरवू', अशी शंका मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा दिल्यामुळं येतेय. म्हणून दिशाभूल करणाऱ्या अशा ड्रामेबाजांना महत्त्व न देता दुर्लक्ष केलेलंच चांगलं व ही सुरक्षा फुकट नसेल, अशी अपेक्षा.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 8, 2020
दरम्यान, सुशांतसिंह प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यानंतर कंगना रणौत हिच्यावरही आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे कंगनाचे ड्रग्ज माफियांशी काही संबंध आहेत का, याबाबत राज्य सरकार चौकशी करणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कंगनानेही सरकारला प्रतिआव्हान दिलं आहे.
'मी खूप आनंदी आहे. माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. तुम्हाला कोणत्याही ड्रग्ज डिलरशी माझे संबंध सापडले तर मी कायमची मुंबई सोडून जाईन,' असं ट्वीट कंगना रणौत हिनं केलं आहे.