मुंबई 03 नोव्हेंबर: मुंबईतल्या मेट्रो कारशेडचा वाद आता आणखी पेटला आहे. केंद्र सरकारने कांजुरच्या जागेवर हक्का सांगितल्याने या वादाला वेगळं वळण मिळालं होतं. आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्राच्या दाव्याला थेट आव्हान दिलंय. कांजुरमार्गची जागा ही महाराष्ट्राचीच असून त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत असा दावा केला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.
मेट्रो कारशेडचं काम थांबणार नाही असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. संबंधित जमीन महसूल विभागाची असून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी जमिनीच्या सर्व न्याय प्रविष्ट बाबी पूर्ण केल्याची माहितीही आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली आहे.
मेट्रो कारशेडला कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. भाजपने (BJP) राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. पण, आता या वादात केंद्र सरकारनेही उडी घेतली आहे. केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. याबद्दल केंद्राने राज्याच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवले आहे.
आरेची 800 एकर जागा जंगल घोषित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडचा प्रकल्प हा कांजूरमार्ग इथं हलवला आहे. त्यानंतर कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात देखील झाली आहे. पण, आता केंद्र सरकारने कांजूरमार्गच्या जागेवर दावा केला आहे.
The Kanjurmarg land allotted by the Collector to MMRDA for Car depot of Metro has always been with Govt of Maharashtra as per revenue records.
The Collector, Mumbai Suburban has done due diligence of all land records and all sub-judice matters in all competent courts.
(1/2)
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 3, 2020
कांजूरमार्गमधील जागा ही मिठागराची असून त्यावरचा हक्का अद्याप सोडला नाही, त्यामुळे ही जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय रद्द करा, असे पत्रच केंद्र सरकारने राज्याच्या सचिवांना पाठवले आहे. त्याचबरोबर कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम त्वरीत थांबावा, असंही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईचा विकास कसा रोखायचा यासाठी केंद्रातील सरकार नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे कांजूरमार्ग मेट्रो प्रकल्पाचे काम थांबविण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे, अशी टीका मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी केली आहे.