Fake Vaccination Camp: आरोपींनी लसीकरण शिबीराचं आयोजन करून मुंबईत जवळपास 2 हजार 53 नागरिकांना बनावट लस दिली आहे. या टोळीला बनावट लस पुरवणाऱ्या आरोपी डॉक्टर दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.
मुंबई, 26 जून: 30 मे 2021 रोजी मुंबईच्या (Mumbai) कांदिवली परिसरातील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत एका बनावट लसीकरण शिबीराचं (Fake vaccination camp) आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी अनेकांना बनावट लशी देण्यात आल्या होत्या. या बनावट लसीकरण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक (10 Arrest) केली आहे. मुंबईकरांना बोगस लस (Fake Vaccine) टोचणार्या टोळीचं कनेक्शन आता चारकोपपर्यंत पोहोचलं आहे. पोलिसांनी बोगस लशीचा पुरवठा करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्यालाही चारकोपमधून अटक केली आहे.
डॉक्टर शिवराज पटारिया आणि त्यांची पत्नी नीता पटारिया अशी या आरोपी दाम्पत्याची नावं असून ते चारकोप येथील रहिवासी आहेत. अटकेत असणाऱ्या आरोपींची चौकशी करत असताना, आरोपींनी चारकोप येथील पटारिया दाम्पत्य बोगस लस पुरवत असल्याची कबुली दिली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.
हेही वाचा-Corona vaccine न घेणं पडलं महागात? लसीकरण न झालेल्या 98% कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
आरोपींनी मुंबईतील जवळपास 2 हजार 53 नागरिकांना बनावट लस दिल्याची धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली आहे. बनावट लसीकरण करणारी ही एकच टोळी असून, या टोळीनं मुंबईत तब्बल 9 वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण शिबीराचं आयोजन केलं होतं. पण तत्पूर्वी त्यांचं बिंग फुटलं आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
हेही वाचा-मुंबईपाठोपाठ ठाण्यातही बोगस लसींचा सुळसुळाट, नागरिकांना लाखोंचा भुर्दंड
याप्रकरणी पोलिसांनी बनावट लसीकरणासाठी वापरण्यात आलेली टोयोटा कारही जप्त केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणातीलदोन मुख्य आरोपी महेंद्र प्रताप सिंग आणि मनीष त्रिपाठी या दोघांची बँक खाती देखील गोठवण्यात आली आहेत. या दोन आरोपींनी आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं मुंबईत बनावट लसीकरण कॅम्प आयोजित करून लुटीचं सत्र चालवलं होतं. पोलिसांनी या टोळीतील 10 जणांना आतापर्यंत अटक करण्यात केली आहे. तसेच 200 पेक्षा अधिक लोकांचे जवाबही नोंदवले आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी 12 लाख 40 हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. शिवाय 114 लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्रंही जप्त केली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.