मुंबई, 14 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका करणं अभिनेत्री केतकी चितळेला प्रचंड महागात पडलं आहे. कारण शरद पवार यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्याने तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिला नवी मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केतकी चितळे हिला कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिला एका रुममध्ये बसून ठेवले आहे. काही वेळातच तिला कळवा पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द केलं जाणार आहे. कळवा पोलीस काही वेळातच कळंबोळी पोलीस ठाण्यात पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतील. कळंबोली पोलीस तिला कळवा पोलिसांच्या ताब्यात देतील.
आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे नेहमीच चर्चेत राहणारी मराठी मालिका अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे. केतकी चितळेने कवितेद्वारे आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये शरद पवारांवर अत्यंत वाईट भाषेत टीका केली आहे. या प्रकरणी केतकी चितळेवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी कलम 500, 505 (2), 501 आणि 153 A हा गुन्हा दाखल केला आहे.
('पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकला असता तर बरं झालं असतं', Imran Khan स्वतःच्याच देशाला असं का म्हणाले?)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केतकीला उद्या ठाणे कोर्टात हजर केलं जाईल. केतकी चितळेला ठाणे क्राईम ब्रांचने अटक केली आहे. अटकेची प्रक्रिया कळंबोली पोलिस ठाण्याला केली जात आहे. तिला रात्री ठाण्यात आणलं जाईल आणि सकाळी ठाणे कोर्टात हजर केलं जाणार आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी एकत्रितपणे ही कारवाई केली आहे.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार आता या प्रकरणी आता गुन्हे शाखा 1 कडून तपास सूरु असल्याचे कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.