राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप, हेरगिरीसाठी मोदी सरकार घेतेय इस्रायलची मदत!

राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप, हेरगिरीसाठी मोदी सरकार घेतेय इस्रायलची मदत!

मोबाईल बेडरूममध्ये ठेवून तुम्हाला कपडे बदलणं सुद्धा शक्य होणार नाही....

  • Share this:

मुंबई,31 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर घणाघाती आरोप केला आहे. भारतीय नागरिकांची हेरगिरी करण्यासाठी मोदी सरकार इस्रायली तंत्रज्ञानाची मदत घेत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत 'ट्विटर'वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'ह्या सरकारचे काय चालू आहे... सगळ्यांच्या खासगी आयुष्यावर नजर.. #धिक्कार' अशा शीर्षकाखाली जितेंद्र आव्हाड यांनी आपला व्हिडिओ पोस्ट करत खळबळजनक दावा केला आहे. तसेच लोकशाहीचा एक घटक म्हणून मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचा फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून निषेध नोंदवला आहे. माझ्या आवाजात आवाज मिळवा, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

'भारतातले अनेक विचारवंत, शिक्षण तज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते, आणि पत्रकार यांच्या फोनमधले व्हाट्सअप मेसेज मे 2019 पर्यंत, त्यांच्या नकळत वाचले जात होते, असा खळबळजनक दावा, व्हाट्सअपने इस्रायलच्या एन एस ओ समूहावर कॅलिफोर्नियात दाखल केलेल्या खटल्यामध्ये करण्यात आला आहे.

इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या बातमीनुसार एन एस ओ ही कंपनी "पीगेसस" नावाचं एक सॉफ्टवेअर बनवते आणि आणि मोबाईल धारकाच्या स्मार्टफोनमध्ये चलाखीने पेरते. 'एक्सप्लॉईट लिंक' या नावाचा पर्याय जर तुम्ही कळत नकळत क्लिक केलात तर पीगेसस तुमच्या मोबाईल मध्ये प्रवेश करतो. त्यानंतर व्हाट्सअपने कितीही सुरक्षिततेचे उपाय योजले, तरी तुमचे मेसेज पीगेसस वाचू शकतो. हे एवढ्यावरच थांबत नाही, तर तुमच्या मोबाईलमधला कॅमेरा चालू करून, तुमच्या आजूबाजूला काय चालू आहे हे सुद्धा त्रयस्थ व्यक्तीला कळू/दिसू शकतं. तुमचे फोन ऐकले जाऊ शकतात हे तर स्वाभाविकच आहे. त्याच्या सुधारित अवतारात आता कुठली लिंक दाबायची सुद्धा गरज नाही. पीगेससने तुम्हाला मिस्ड व्हिडिओ कॉल दिला तरी त्याचा तुमच्या फोनमध्ये प्रवेश होतो.

थोडक्यात, मोबाईल बेडरूममध्ये ठेवून तुम्हाला कपडे बदलणं सुद्धा शक्य होणार नाही. या सॉफ्टवेअरचा तुमच्या मोबाईल मध्ये चोरटा प्रवेश झाला तर मोबाईल धारकाला काहीही खाजगी आयुष्य शिल्लक राहत नाही. धक्कादायक बाब म्हणजे एन एस ओ ने दिलेल्या माहितीनुसार, हे सॉफ्टवेअर फक्त आणि फक्त जगभरातल्या सरकारी यंत्रणांना विकलं जातं. भारत सरकारच्या कुठल्या यंत्रणेने हे विकत घेतलं होतं, या इंडियन एक्सप्रेसच्या प्रश्नाला गृहसचिव ए. के. भल्ला आणि माहिती तंत्रज्ञान सचिव ए. के. सहानी यांनी उत्तर दिलेलं नाही.

ज्या दोन डझन व्यक्तींचे फोन पीगेससच्या पाळतीखाली होते त्यांची नावं सांगायला व्हाट्सअपने नकार दिला. परंतु त्यांच्या फोन मध्ये या हेरगिरी करणाऱ्या सॉफ्टवेअरचा प्रवेश झालेला आहे याची कल्पना आपण त्या संबंधितांना दिली होती, असं व्हाट्सअप ने आपल्या खटल्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. एकूणच हा सारा प्रकार भयानक आणि अंगावर शहारे आणणारा आहे. आपल्याला वैचारिक विरोध करणाऱ्या व्यक्तींना मोदी सरकार कशा पद्धतीने चिरडू पाहत आहे हे यातून स्पष्टपणे दिसतं. ही पद्धत पाहता, मोदी सरकार या देशात अजूनही लोकशाही पद्धतीने कारभार करत आहे असा ज्यांचा दावा असेल त्यांना भर रस्त्यात चपलांनी बडवलं पाहिजे. ही पाताळयंत्री हुकुमशाही आहे.

अमेरिकेत हेन्री किसिंजर आणि अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचं वॉटरगेट प्रकरण उघडकीला आल्यानंतर निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. भारतात सुद्धा कर्नाटकात रामकृष्ण हेगडे यांना फोन टॅपिंग प्रकरणाची जबर किंमत मोजावी लागली होती. तर मग आता नरेंद्र मोदी कोण मोठे लागून गेले की जे बेकायदा, अनैतिक आणि अश्लाघ्य मार्गाने आपल्याच देशाच्या नागरिकांवर अशी हेरगिरी करतील? आज जे राजकीय विरोधकांच्या बाबतीत घडतं, ते उद्या ज्यांची भक्ती किंचितही कमी झाली, त्यांच्या बाबतीत सुद्धा घडू शकतं. विरोधकांचा बंदोबस्त करण्याची ही पद्धत, एक सवय किंवा प्रघात पडेल आणि त्यातून मोदी समर्थक सुद्धा भविष्यात सुटणार नाहीत. मी एक सामान्य राजकीय कार्यकर्ता आहे. पण सामान्य माणसं मिळूनच लोकशाही निर्माण होत असते. या लोकशाहीचा एक भाग म्हणून मी आज आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचा निषेध नोंदवत आहे.

माझ्या आवाजात आवाज मिळवा ही विनंती.'

-डॉ. जितेंद्र आव्हाड

VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

Published by: Sandip Parolekar
First published: October 31, 2019, 7:43 PM IST

ताज्या बातम्या