मोदींचं पाकिस्तानला 'लव्हलेटर'; जितेंद्र आव्हाडांची उपरोधिक टीका

मोदींचं पाकिस्तानला 'लव्हलेटर'; जितेंद्र आव्हाडांची उपरोधिक टीका

जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मार्च : पाकिस्तानला राष्ट्रीय दिनाच्या नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या, असं ट्विट इम्रान खान यांनी केलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपरोधिक टीका केली आहे.

काय म्हटलं आहे पत्रात

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खानला शुभेच्छा पाठवल्या त्यात गैर काहीच नाही. पाकिस्तानने जर दहशतवाद्यांना पाठिंबा द्यायचा थांबवलं, तर आपल्यालाही पाकिस्तानशी वैर ठेवण्यात काहीही रस नाही. उलट मैत्रीच हवी आहे. मारामारी आणि भांडणात खर्च होणारा वेळ आणि पैसा आपण आपल्या देशाच्या समृद्धीसाठी वापरू शकतो.

पण एक दोन गोष्टी प्रचंड खटकतात. पुलवामा आणि बालाकोट प्रकरणानंतर मोदी यांनी आपल्या भाषणांमधून पाकिस्तानबद्दल अहोरात्र गरळ ओकायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानशी वैर, हा केंद्रबिंदू ठेवूनच त्यांचा निवडणूक प्रचार सुरू आहे. आजची प्रचंड बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ढासळलेली अर्थव्यवस्था, गाळात जात असलेल्या सरकारी कंपन्या, असे अनेक गंभीर प्रश्न आ वासून उभे असताना, त्याबाबत काही बोलण्याऐवजी मोदी फक्त आणि फक्त पाकिस्तान द्वेष आपल्या भाषणांमधून व्यक्त करत आहेत. मूळ मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि पाकिस्तानचा भावनात्मक मुद्दा पेटवत ठेवायचा ही कूटनीती त्यामागे आहे.

पाकिस्तान हा जर इतका बदमाश देश आहे तर मग त्याला हे चोरून प्रेमपत्र पाठवायची काय आवश्यकता आहे? चोरून हा शब्द मी मुद्दाम वापरला. याचं कारण पाकिस्तानला शुभेच्छांचा संदेश भारतातर्फे पाठवला गेला हे आपल्याला भारत सरकारकडून कळलेलं नाही. तर पाकिस्तान कडून कळलं आहे. चाणाक्ष इम्रान खानने ट्विट करुन मोदी यांनी आपल्याला हा संदेश पाठवल्याचं जाहीर केलं. ते स्वतः मोदी यांनी आपल्याला का कळवलं नाही या गोष्टीचा विचार केला तर मोदी यांचा दुटप्पीपणा दिसून येतो. एकीकडे अहोरात्र पाकिस्तानच्या नावाने शिमगा करायचा आणि दुसरीकडे चोरुन लव्हलेटर पाठवत बसायचं हाच तो दुटप्पीपणा आहे.

देशाची दिशाभूल करण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही पाच वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या शपथविधीला नवाज शरीफ यांना आमंत्रित केलं होतं. त्यानंतर मध्येच वाटेत एखाद्या जिवलग मित्राच्या घरी गल्लीत मोटारसायकल पार्क करून थांबावं, तसे ते विमान इस्लामाबादला उतरवून नवाज शरीफ यांच्या घरी गेले. त्यांना वाढदिवसाचा केक दिला आणि त्यांच्या घरी बिर्याणीवर ताव मारून परत आले. त्यात कसलीही मुत्सद्देगिरी नव्हती. तो शुद्ध बालिशपणा, चावटपणा आणि एक प्रसिद्धी स्टंट होता. पाकिस्तान सारख्या वात्रट शेजाऱ्याशी आपण काय संबंध ठेवायचे यासाठी एक सुसूत्र धोरण हवं. मोदींनी मात्र पाकिस्तानचा वापर भारतीय जनतेच्या भावना भडकवून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केला. देशहित आणि दूरदृष्टी हे शब्द या माणसाच्या गावी सुद्धा नाहीत. हा माणूस केवळ सत्तेचा भुकेला आहे हे या नव्या प्रेमपत्रामुळे पुन्हा सिद्ध झालं.

- डॉ. जितेंद्र आव्हाड

VIDEO : मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार? उदयनराजेंचं विद्यार्थिनीच्या प्रश्नावर उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading