Home /News /mumbai /

ते पुन्हा येणार पण उपमुख्यमंत्री बनून! अमित शाहांनी वळवलं फडणवीसांचं मन

ते पुन्हा येणार पण उपमुख्यमंत्री बनून! अमित शाहांनी वळवलं फडणवीसांचं मन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होतील, अशी माहिती नड्डा यांनी दिली आहे.

    मुंबई, 30 जून : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (Maharashtra Deputy CM) होतील, अशी माहिती नड्डा यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्याआधी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshari) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राजभवनातच पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. तसेच आपण मंत्रिमंडळात राहणार नाही. आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून सरकारला पाठिंबा देवू, मंत्रिमंडळात शिवसेना आणि भाजपचे आमदार असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण त्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय कमिटीने फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्याचा आग्रह केला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच फडणवीसांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी आग्रह केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जे. पी. नड्डा नेमकं काय म्हणाले? "देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की, ते सरकारच्या बाहेर राहून पाठिंबा देतील. तसेच भाजपचं एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे पाठिंबा राहील. त्यांची ही भूमिका आमच्या पक्षाच्या कार्यकर्ता आणि नेत्याचं चरित्र दर्शवतं. आम्हाला कोणत्याही पदाचं स्वार्थ नाही, हे दाखवून देत आहे. आम्ही पदाच्या लालसेसाठी नाही आहोत, आम्ही विचारासाठी आहोत. विचारासोबतच महाराष्ट्राच्या जनतेचा विकास होवो, जनतेची आकांक्षा पूर्ण व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारपासून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. पण भाजपच्या केंद्रीय टीमने देवेंद्र यांना सरकारमध्ये आलं पाहिजे, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीमने देवेंद्र यांनादेखील आग्रह केला आहे. केंद्रीय टीमने देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा, असा आदेश दिला आहे", अशी माहिती जे. पी. नड्डा यांनी दिली. (एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा) विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. "भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांची महाराष्ट्राप्रती असणारी खरी निष्ठा आणि सेवेच्या समर्पणासाठी असणारी तयारी दर्शवते. त्यामुळे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन", असं अमित शाह ट्विटरवर म्हणाले. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेवून याबाबतची मोठी घोषणा केली. "शिवसेनेचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. अजून काही नेते येत आहेत. सगळ्यांचे पत्र आज आम्ही राज्यपालांना दिले आहेत. भाजपने निर्णय घेतलाय की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही आहोत. कुठल्यातरी मुख्यमंत्रीपदाकरता आम्ही काम करत नाहीयत. ही तत्त्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. ही विचारांची लढाई आहे. म्हणून भाजपने निर्णय घेतलाय की, एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी होईल. लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. यामध्ये शिवसेना आणि भाजपचे आमदार येतील. मी स्वत: बाहेर असेन, पण हे सरकार चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी असेल", अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईत दाखल झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राजभवनावर दाखल झाले. यावेळी फडणवीस आणि शिंदे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी मोठी घोषणा केली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या