Home /News /mumbai /

गृहमंत्र्यांबाबत IPS परमवीर सिंह यांनी केलेला दावा खोटा? CNN News18च्या हाती महत्त्वाची कागदपत्रे

गृहमंत्र्यांबाबत IPS परमवीर सिंह यांनी केलेला दावा खोटा? CNN News18च्या हाती महत्त्वाची कागदपत्रे

परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून (Param Bir Singh Letter) गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप करत देशभर खळबळ उडवून दिली.

  विनया देशपांडे, मुंबई, 21 मार्च : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून (Param Bir Singh Letter) गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप करत देशभर खळबळ उडवून दिली. 'अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना दरमहिना 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितलं होतं,' असा गौप्यस्फोट परमवीर सिंह यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. मात्र परमवीर सिंह यांनी आरोप करताना अनिल देशमुख यांच्याबाबत केलेल्या एका दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी काही कागदपत्रे CNN News18च्या हाती लागली आहेत. परमवीर सिंह यांच्या दाव्यानुसार, अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईत भेटायला बोलावलं. मात्र ज्या दिवशी सचिन वाझे यांना देशमुख यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा दावा परमवीर सिंह यांनी केला आहे, त्या दिवशी अनिल देशमुख स्वतः नागपूरच्या एका रुग्णालयात उपचार घेत होते आणि कोरोनाची लागण झाल्याने विलगीकरणात होते, असं उपलब्ध झालेल्या कागदपत्रांतून स्पष्ट होत आहे. तसंच त्यावेळी देशमुख यांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांना बोलण्यासही त्रास होत असल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलं आहे. या कागदपत्रांमुळे आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांच्या दाव्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान, ही कागदपत्रे समोर आल्यानंतर अद्याप परमवीर सिंह यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर ही बातमी अपडेट केली जाईल. अनिल देशमुख यांनी काय स्पष्टीकरण दिलं होतं? 'मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटकं तसंच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत आहे. त्यामुळे परमवीर सिंह यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे,' असा दावा अनिल देशमुख यांनी ट्वीट करत केला होता.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Anil deshmukh, Sachin vaze

  पुढील बातम्या