ठाकुर्लीत भरदिवसा गोळीबार,एकाचा मृत्यू

ठाकुर्लीत भरदिवसा गोळीबार,एकाचा मृत्यू

घरातील इंटिरिअर ठेका हद्दीच्या वादातून घरात घुसून करण्यात आलेल्या बेछूट गोळीबारामध्ये ठेकेदार किशोर किसन चौधरी (42) याचा मृत्यू झालाय. तर नितीन कृष्णा जोशी (32) हा गंभीर जखमी झाल्याची घटना चोळेगाव-ठाकुर्ली परिसरात भरदिवसा घडलीये.

  • Share this:

प्रदीप भणगे, डोंबिवली

09 मे :  घरातील इंटिरिअर ठेका हद्दीच्या वादातून घरात घुसून करण्यात आलेल्या बेछूट गोळीबारामध्ये  ठेकेदार किशोर किसन चौधरी (42) याचा मृत्यू झालाय.  तर नितीन कृष्णा जोशी (32) हा गंभीर जखमी झाल्याची घटना चोळेगाव-ठाकुर्ली परिसरात भरदिवसा घडलीये.

चोळेगाव-ठाकुर्ली येथे राहणारे किशोर चौधरी हे घर दुरूस्ती आणि इंटिरिअरची कामे घेतात. याच काम घेण्याच्या स्पर्धेतून चौधरी यांचा दिलीप भोईर याच्याशी हद्दीवरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यातच किशोर चौधरी यांनी बालाजीनगरमध्ये असलेल्या देवी शीवामृत सोसायटीच्या तळ मजल्यावर राहणारे व्ही. जी. काळे यांच्या फ्लॅटची दुरूस्ती आणि इंटिरिअरचे काम सुरू केले होते. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुरूस्तीचे काम सुरू करून साडे अकराच्या सुमारास किशोर चौधरी हे नितीन जोशी, प्रमोद यांच्यासह बसले होते. इतक्यात अचानक दिलीप भोईर हा त्याच्या चार-पाच साथीदारांसह या फ्लॅटमध्ये घुसला. सोबत आणलेल्या रिव्हॉल्व्हरमधून दिलीप आणि त्याच्या साथीदारांनी किशोरच्या दिशेने गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांकडून तब्बल 19 गोळ्या झाडण्यात आल्या. अचानक झालेल्या या गोळीबारात किशोर चौधरी याच्या डोके आणि छातीत 12 गोळ्या घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. हे पाहून मधे पडलेल्या नितीन जोशी याच्या छातीत गोळी घुसल्याने तोही कोसळला. तर किशोरचा मित्र प्रमोद याने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून पळ काढला.

या हल्ल्यात जखमी झालेल्या नितीनवर शिवम या खासगी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चिंताजनक परिस्थिती असली तरी त्याच्या प्रकृतीत किंचीतशी सुधारणा होत असल्याचे तेथील डॉक्टर लालजी यादव यांनी सांगितलं. तर पोलिसांनी या प्रकरणी दिलीप भोईर याच्यासह परेश आंदले, सूरज भोईर ,शंकर भोईर, चिराग भोईर या त्याच्या साथीदारांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, अग्निशस्त्र विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. एकीकडे चोळेगाव-ठाकुर्लीत भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली होती. तर दुसरीकडे किशोर चौधरी याचा मृतदेह ठेवलेल्या शिवम हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी जमली होती.

पोलिसांनी संशयित हल्लेखोर दिलीप भोईर याच्यासह परेश आंदले, सूरज भोईर, शंकर भोईर, चिराग भोईर आणि त्यांच्या साथीदारांच्या मागावर पोलिसांची 4 पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना झाली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2017 07:50 PM IST

ताज्या बातम्या