INSIDE STORY :...म्हणून अजितदादा फडणवीसांना भेटायला गेले होते, शरद पवारांचा मोठा खुलासा

INSIDE STORY :...म्हणून अजितदादा फडणवीसांना भेटायला गेले होते, शरद पवारांचा मोठा खुलासा

फडणवीस आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची इच्छा होती, असा खुलासाही पवार यांनी केला.

  • Share this:

मुंबई, 02 डिसेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारून भाजपशी हातमिळवणी केली होती. पण त्यांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे सरकार कोसळले. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे.  फडणवीस आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची इच्छा होती, असा खुलासाही पवार यांनी केला.

एबीपी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी सत्तासंघर्षाच्या काळात घडलेल्या सर्व घडामोडींवर पहिल्यांदाच जाहीर खुलासा केला आहे.  भाजप आणि शिवसेनेनं एकत्र येऊन सरकार स्थापन करणे गरजेचं होतं. पण त्यांच्यामध्ये मतभेद झाल्यामुळे ते होऊ शकलं नाही. शिवसेनेकडून मला खात्री हवी होती. ती खात्री मला भेटली त्यानंतर मी थेट सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया यांनीही हे केलं पाहिजे असं स्पष्ट केलं. त्यानंतर आमच्यात चर्चा सुरू झाली होती, असं पवारांनी सांगितलं.

नेहरू सेंटरमधील बैठकीत झाला वाद

आमच्या आधीच बैठका सुरू होत्या. नेहरू सेंटरवर सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महत्त्वाची बैठक झाली. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही नेत्यांचे तीव्र मतभेद झाले. ते कारण सत्ता स्थापनेच्या विषयावर नव्हतं. ती वादावादी प्रचंड टोकाला गेली. त्यामुळे मी बैठकीतून बाहेर पडलो. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेतेही उपस्थितीत होते.  त्यावेळी अजित पवार यांनी आपण यांच्यासोबत सरकार स्थापन करत आहोत, आणि हे आताच असे वागायला लागले तर पुढे काय करतील, असा आक्षेप घेतला होता. त्यानंतर रात्री ते देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि चर्चा करून निर्णय घेतला, असा खुलासा पवारांनी केली.

'फडणवीसांसह भाजप नेत्यांची राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची इच्छा'

परंतु, अजित पवारांनी असा निर्णय घेण्याआधी त्याला आधीची थोडी पार्श्वभूमी आहे. फडणवीस आणि भाजपच्या गोटातील काही नेत्यांना असं वाटतं होतं की, त्यांनी आम्ही त्यांच्यासोबत बोलावलं. भाजपचे ज्येष्ठ नेतेही दिल्लीच  भेटायचे तेव्हा आपण एकत्र काम केलं पाहिजे, असं सांगायचे, असा गौप्यस्फोट पवारांनी केला.

एवढंच नाहीतर फडणवीस यांचे राष्ट्रवादीतील काही नेत्यांसोबत चांगले संबंध होते. त्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी मला विचारले होते, की मी जाऊ का? त्यानंतर मी अजित यांना सांगितलं की, राजकारणामध्ये डायलॉग ठेवला पाहिजे. फडणवीस यांना बोलायचं असेल तर ऐकून घ्यायला हरकत नाही. परंतु, आपल्याला काही त्या वाटेला जायचं नाही. स्वीकारयचं की नाही ते आपण ठरवू. त्यानंतर दोघांची चर्चा झाली आणि सत्ता स्थापन करण्यावर बोलणं झालं. दोन दिवसांनंतर अजित पवार मला भेटले. अजित यांनी फडणवीस यांचा निरोप मला दिला. तेव्हा मी कामात होतो, आपल्याला काही घाई नव्हती. फडणवीस यांच्यासोबत जायचं हे काही आमच्या मनात नव्हतं. पण त्यांची मतं काय होती, ती जाणून घेतली. याबद्दल निर्णय घेण्याची काही आवश्यकता तातडीने नव्हती, असा खुलासाही त्यांनी केला.

सेनेकडून होकार!

संजय राऊत यांच्यासोबत बोलणं सुरू होतं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे एकत्र येण्याबद्दल सांगितलं. शिवसेना जर भाजपमधून बाहेर पडली तर राज्यात एक वेगळं स्थिती निर्माण करू शकतो. त्यानंतर शिवसेना आणि आमच्यात एकमत झालं होतं, असंही पवारांनी सांगितलं.

फडणवीस-अजितदादा भेटले

विधिमंडळ सदस्यांची बैठकीला हजर राहणारी यादी होती. त्यातील एक यादीही अजित पवारांकडेही होती. त्याच रात्री नेहरू सेंटरवर झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये  मतभेद निर्माण झाल्यामुळे अजितदादांनी त्याच रात्री फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी बैठकीला हजर राहिलेल्या आमदारांच्या सह्यांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. त्यानंतर रात्रीच सर्व गंमती घडल्या. पंतप्रधान मोदी यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस राष्ट्रपतीकडे केली. राष्ट्रपतींनी रात्रभरातच राष्ट्रपती राजवट उठवण्याचा निर्णय घेतला. आणि  सकाळी फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. अजित पवारांना अटच घालण्यात आली होती की, लगेच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्या तरच सरकार स्थापन करू, तेव्हा त्यांनी होकार कळवला आणि हे सगळं नाट्य घडलं, असं खुद्द पवारांनी सांगितलं.

'सकाळी 6 वाजता कुटुंबांतील व्यक्तीने फोन केला'

मला हे सगळं काही माहिती नव्हतं. सकाळी 6 वाजता घरातील एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यांनी मला माहिती दिली. यावर सुरुवातील मला विश्वासच बसला नाही. मग टीव्ही लावला असता सगळं काही दिसायला लागलं. माझ्यासोबत जी लोकं होती, ते असं करूच शकत नव्हते. त्यांनी माझं नाव वापरून हे सगळं काही केलं. त्यानंतर मी ठरवलं जे होईल ते होईल, पण हे असं खपवून घ्यायचं नाही. त्यानंतर दोन तीन तासांमध्येच सगळं काही आटोक्यात आलं होतं. अजित पवारांना दोन तासांमध्ये कळलं की, आपलं चुकलं आहे. त्यांनी लगेच माघार घेतली.  अत्यंत अक्षम्य ही चूक होती.  अजित पवार यांनी माझ्याकडे येऊन चूक झाली हे कबूल केलं होतं. आणि जी काही शिक्षा देणार ती मान्य आहे, असंही सांगितलं. त्यानंतर मी तातडीने निर्णय घेतला आणि सर्व आमदारही तोपर्यंत माघारी परतले होते, असं पवारांनी सांगितलं.

...म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली नाही

अजित पवारांनी जे केलं ते अत्यंत चुकीचं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये चुकीचा निरोप गेला. त्यांनी शपथ घ्यावी हे माझं पहिलेच ठरलं होतं. पण, त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेऊन चूक केली. त्यामुळे  शपथविधीलाही अजित पवारांची शपथ न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. जयंत पाटील हे पक्षासोबत मजबूत उभे होते. त्यांनी आणि भुजबळांनी शपथ घ्यावी असा निर्णय झाला, असंही पवारांनी सांगितलं.

'राष्ट्रपतीची ऑफर चुकीची'

पंतप्रधानांना भेटण्याची वेळ मी आधीच मागितली होती. मात्र ते जमू शकलं नाही. शेवटी पंतप्रधान कार्यालयाने वेळ दिली. संभ्रम निर्माण व्हावा अशी पंतप्रधान कार्यालयाची इच्छा असावी. मात्र मला त्याची काळजी नव्हती. मी विदर्भातल्या दुष्काळी दौऱ्यावरून आलो होतो. मलाही त्यांना भेटायचं होतं त्यामुळे मी भेटलो.

आमच्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलणं झालं आणि शेवटी जाताना पंतप्रधान मोदींनीच हा विषय काढला. ते म्हणाले राज्यात तुम्ही आणि आम्ही एकत्र काम केलं तर चांगलं होईल. म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र यावं असं पंतप्रधानांना वाटत होतं. त्यांनीच तसा प्रस्ताव मांडल्यावर मी त्यांना स्वच्छ आणि स्पष्टपणे नाही असं सांगितलं. राष्ट्रीय प्रश्नांवर विरोधाला विरोध करणार नाही, मात्र एकत्र येणं शक्य नाही असं मी मोदींना नम्रपणे सांगितलं. भाजपसोबत जाण्याला राष्ट्रवादीचं केडरही तयार नाही. आमची विचारसरणीही वेगळी आहे. त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही हे मी मोदींना स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी मला कुठलीही राष्ट्रपतीची ऑफर दिली नव्हती, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

 

 

First published: December 2, 2019, 9:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading