मुंबई 26 ऑगस्ट: राज्यात महाविकास आघाडीचं तीन पक्षांचं सरकार आहे. मात्र या तीनही पक्षांमध्ये राष्ट्रवादीचाच सर्वात जास्त दबदबा असल्याची कायम चर्चा असते. शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या राजीनाम्यामुळे त्याची चर्चा आता जोरात सुरु झालीय.जाधव यांच्या परभणी मतदार संघात येणाऱ्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचं अशासकीय मंडळ असावं असा प्रयत्न जाधव करत होते. 8 ते 10 महिने प्रयत्न केली मात्र शिवसेनेचं नाही तर राष्ट्रवादीचं प्रशासकीय मंडळ नियुक्त केलं गेलं.
जिंतूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार नसतांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या मंडळावर घेतलं गेलं. त्यामुळे शिवसैनिकांचा प्रचंड हिरमोड झाला आहे अशी खंत जाधव यांनी व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. जाधव यांनी राजीनामापत्रात आपल्या व्यथेला मोकळी वाट करून दिल्याने शिवसेनेतही अस्वस्थता आहे.
शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम होत नसल्याची शिवसैनिकांची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेचा पुरेपूर वापर करत आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि कार्यकर्त्यांना ताकद देत आहे. असंही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.
या अन्यायाची बाब माझ्या मनाला खटकली असून कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. अशा परिस्थितीत खासदार पदावर राहण्याचा मला मुळीच अधिकार नाही. जिल्ह्यातील सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेच येण्यास उत्सुक आहेत. मात्र मी जर शिवसैनिकांनाच न्याय देऊ शकत नसेल तर या कार्यकर्त्यांना मी काय सांगू अशी व्यथाही त्यांनी मांडली आहे.
एकदाच नाही तर दोनदा अशीच घटना घडल्याने मी नाराज आहे. असं सांगत त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे.