• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने आपण किती मजल मारली? स्वातंत्र्यदिनी शिवसेनेनं कोरोनासोबतच आणखी एका संकटाचा केला उल्लेख

स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने आपण किती मजल मारली? स्वातंत्र्यदिनी शिवसेनेनं कोरोनासोबतच आणखी एका संकटाचा केला उल्लेख

स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने आपण किती मजल मारली? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 15 ऑगस्ट : 'सुमारे पाऊणशेच्या घरात पोहोचलेले हिंदुस्थानी स्वातंत्र्याचे वयोमान काळाच्या कसोटीवर मोजले तर निश्चितच कमी नाही. स्वातंत्र्याबरोबरच सामर्थ्यशाली आणि स्वावलंबी होण्यासाठी कुठल्याही राष्ट्रासाठी हा तसा पुरेसा कालखंड म्हणावा लागेल. एक स्वतंत्र देश म्हणून आपण परिपक्व आणि प्रगल्भ निश्चितच झालो, पण ‘कोरोना’ ते ‘चीन’ या स्वातंत्र्यावरील दुहेरी संकटाचा विचार करता सामर्थ्यशाली आणि स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने आपण किती मजल मारली याचे चिंतन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांनीच करायला हवे', असं भाष्य शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आलं आहे. 'उघडय़ा डोळ्य़ांनी दृष्टीसही न पडणाऱ्य़ा एका सूक्ष्म विषाणूने एका वेगळ्या प्रकारच्या पारतंत्र्यात देशाला ढकलले आहे. या विषाणूपासून स्वातंत्र्य कसे मिळवायचे हाच आज देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. जगभरात साडेसात लाख बळी घेणाऱ्य़ा कोरोनाच्या राक्षसाने हिंदुस्थानच्या गावागावांत आपले हातपाय पसरले आहेत. 24 लाख लोक संक्रमित झालेत आणि ही संख्या रोज नवे विक्रम करत वाढतेच आहे. याचा अंत कुठे आणि कसा होणार याचे उत्तर कोणाकडेच नाही. स्वतंत्र हिंदुस्थानातील आजवरचे हे सर्वात मोठे संकट कसे परतवून लावायचे हेच देशासमोरील आज सर्वात मोठे आव्हान आहे,' अशा शब्दांमध्ये देशातील कोरोना संकटाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हे वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण, पाहा हे PHOTOS काय आहे सामनाचा अग्रलेख? "हिंदुस्थान आज आपला 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे. त्यामुळे एरवी जसे गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रभात फेऱ्य़ा आणि एकूणच धूमधडाका असतो तसे जल्लोषपूर्ण सोहळे यंदा होणार नाहीत. कोरोनाच्या भयाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून झेंडावंदन होईल. देशभक्तिपर गीतांबरोबरच ‘वंदे मातरम्’चा गजर होईल. महत्त्वाचे म्हणजे सालाबादप्रमाणे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करतील. मात्र राजधानीसह देशाच्या कानाकोपऱ्य़ात होणाऱ्य़ा स्वातंत्र्य दिनाच्या सोहळय़ांवर कोरोनाचे सावट आहे. हजारो, लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलून, ब्रिटिशांच्या लाठ्या खाऊन परकीय सत्तेपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, तो हा पवित्र दिवस. मात्र गेले पाच-सहा महिने उच्छाद मांडणाऱ्य़ा कोरोनाच्या विषाणूने राष्ट्रीय सणाच्या उत्साहावरही विरजण घातलेच. लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्य़ा मुख्य सोहळ्यास दरवर्षी 800 हून अधिक मान्यवर हजर असत, मात्र यंदाच्या सोहळ्यासाठी ही संख्या केवळ 125 वर आणण्यात आली आहे. दिल्लीतील विविध शाळांची 4 हजारांहून अधिक मुले लाल किल्ल्याच्या सोहळ्याला दरवर्षी उपस्थित असतात. मात्र यंदा एनसीसीचे 500 कॅडेट तेवढे हजर असणार आहेत. लाल किल्ल्याच्या आणि सोहळ्याच्या एकूणच संरक्षणासाठी तैनात केलेले पोलीसही पीपीई किट घालूनच पहारा देणार आहेत. हे वाचा-PM मोदींनी मोडला अटलजींचा रेकॉर्ड, पाहा लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणाचे खास PHOTOS हिंदुस्थानला पारतंत्र्यात ढकलणाऱ्य़ा शक्तिशाली ब्रिटिश राजवटीला या देशातील सामान्य जनतेने पिटाळून लावले. मोठय़ा संघर्षातून स्वातंत्र्याची पहाट उगवली. मात्र उघडय़ा डोळ्य़ांनी दृष्टीसही न पडणाऱ्य़ा एका सूक्ष्म विषाणूने एका वेगळ्या प्रकारच्या पारतंत्र्यात देशाला ढकलले आहे. या विषाणूपासून स्वातंत्र्य कसे मिळवायचे हाच आज देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. जगभरात साडेसात लाख बळी घेणाऱ्य़ा कोरोनाच्या राक्षसाने हिंदुस्थानच्या गावागावांत आपले हातपाय पसरले आहेत. 24 लाख लोक संक्रमित झालेत आणि ही संख्या रोज नवे विक्रम करत वाढतेच आहे. याचा अंत कुठे आणि कसा होणार याचे उत्तर कोणाकडेच नाही. स्वतंत्र हिंदुस्थानातील आजवरचे हे सर्वात मोठे संकट कसे परतवून लावायचे हेच देशासमोरील आज सर्वात मोठे आव्हान आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा याच तीन मूलभूत गरजांभोवती आजवरच्या तमाम राज्यकर्त्यांची धोरणे फिरत राहिली. हेच तिन्ही प्रश्न आजही जैसे थे आहेत. त्यात कोरोनामुळे आता ‘आरोग्य’ या नव्या मूलभूत गरजेचा समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्राला उद्देशून भाषण करतील तेव्हा आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सुविधा याविषयी निश्चितच काही ठोस धोरणे जाहीर करतील. कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवून देणारी पावले पंतप्रधानांच्या भाषणातून उमटतील, अशी आशा करूया. केवळ कोरोनाच नव्हे तर त्यासोबत आलेली इतर संकटेही तेवढीच गंभीर आहेत. चार महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे ओढवलेली प्रचंड आर्थिक मंदी, देशाच्या तिजोरीतील खडखडाट, डबघाईला आलेली बँकिंग व्यवस्था, लाखो लोकांच्या नोकऱ्य़ा गेल्यामुळे निर्माण झालेला बेरोजगारीचा प्रचंड प्रश्न अशा अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. चीनमधून आलेली कोरोनाची आपत्ती जीवघेणी ठरत असतानाच चीनने लडाख आणि गलवान खोऱ्य़ात केलेली घुसखोरी यामुळे हिमालयाच्या पर्वतरांगांत युद्धाचे ढग दाटू लागले आहेत. आधीच पाकिस्तानला मांडीवर घेऊन बसलेल्या चीनने आता आपला नैसर्गिक मित्र असलेल्या नेपाळलाही कडेवर घेतले आहे. हे वाचा-Independence Day 2020: 17,000 फूटांवर फडकला भारताचा तिरंगा, पाहा हे PHOTOS सीमेवर नियमित युद्धसराव करणाऱ्य़ा चीनने तिबेटपासून काठमांडूपर्यंत भुयारी मार्ग खोदण्याच्या हालचाली चालवल्या आहेत. प्रश्न अनेक आहेत, पण त्यावर मात करावीच लागेल. सुमारे पाऊणशेच्या घरात पोहोचलेले हिंदुस्थानी स्वातंत्र्याचे वयोमान काळाच्या कसोटीवर मोजले तर निश्चितच कमी नाही. स्वातंत्र्याबरोबरच सामर्थ्यशाली आणि स्वावलंबी होण्यासाठी कुठल्याही राष्ट्रासाठी हा तसा पुरेसा कालखंड म्हणावा लागेल. एक स्वतंत्र देश म्हणून आपण परिपक्व आणि प्रगल्भ निश्चितच झालो, पण ‘कोरोना’ ते ‘चीन’ या स्वातंत्र्यावरील दुहेरी संकटाचा विचार करता सामर्थ्यशाली आणि स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने आपण किती मजल मारली, याचे चिंतन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांनीच करायला हवे!"
  Published by:Akshay Shitole
  First published: