मुंबई, 20 मार्च : आज महाराष्ट्रातील राजकारणाला हादरवणारा प्रकार घडला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून अख्खा महाराष्ट्र हादरवून टाकला आहे. या पत्रावरुन भाजपाने ठाकरे सरकारला पुन्हा एकदा घेराव घातला आहे. राज्यात आधीच कोरोनाचं संकट असताना आता विरोधी पक्षाकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. ( Raj Thackeray aggressive on state government)
अनेक भाजप नेत्यांनी सोशल मीडियावर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील ट्वीट करीत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनीही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.
हे ही वाचा-आता गृहमंत्र्यांचाही राजीनामा? परमवीर सिंहांच्या खळबळजनक पत्रामुळे भाजप आक्रमक
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.
— Raj Thackeray (@RajThackeray) March 20, 2021
मुंबईचे माजी पोलीस आयुक्तांचं खळबळजनक पत्र
या पत्रात परमवीर सिंह यांनी मुंबईतील स्फोटकं, सचिन वाझे यांची अटक आणि इतर काही मुद्द्यांवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर घणघाती आरोप केले आहेत.
'गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील काही पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून पैसे वसुली करण्याबाबत बैठका घेतल्या होत्या. तसंच एपीआय सचिन वाझे यांना दर महिना 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितलं होतं,' असा गौप्यस्फोट परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
दरम्यान, या सर्व घटनाक्रमामुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व घटनांमुळे राज्याच्या गृहखात्याची मात्र मोठी बदनामी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आगामी काळात कडक पाऊल उचलणार का, हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Mumbai, Raj thacarey