'सामना'मधून मुख्यमंत्र्यांचा समाचार, परप्रांतीयांचं कौतुक करण्यावरून सडकून टीका

'सामना'मधून मुख्यमंत्र्यांचा समाचार, परप्रांतीयांचं कौतुक करण्यावरून सडकून टीका

परप्रांतीयांचं कौतुक केलं म्हणून सामनाच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका करण्यात आलीये. मुख्यमंत्र्यांनी आपलं विधान मागे घ्यावं, अशी मागणीही करण्यात आली आहे.

  • Share this:

02 डिसेंबर : परप्रांतीयांचं कौतुक केलं म्हणून सामनाच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका करण्यात आलीये. मुख्यमंत्र्यांनी आपलं विधान मागे घ्यावं, अशी मागणीही करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचं विधान बेजबाबदारपणाचं आहे. मुंबईवरचा मराठी माणसाचा हक्क नाकारण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोपही करण्यात आलाय. मुंबईसाठी ज्या १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं, त्यांचा हा अपमान आहे, मुख्यमंत्र्यांना त्याचं स्मरण नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. 'सामना' वर्तमानपत्रात अग्रलेखातून ही टीका केलीय.

मुंबईतील उत्तर भारतीय तसंच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक मुंबईला महान करतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला आहे असं कौतुक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. हिंदी विद्या प्रचार समितीतर्फे घाटकोपरमध्ये तयार करण्यात आलेल्या शिक्षण महर्षी श्री आई डी सिंह यांच्या नावाच्या चौकाचे उद्घाटन करताना ते म्हणाले होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर भारतीयांचं कौतुक केलं.  भाषा हे संपर्काचे साधन आहे, ते विवादाचे माध्यम नाही. हा वाद निर्माण करणे चुकीचे आहे. उत्तर भारतीय तसंच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक मुंबईला महान करतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

अग्रलेखात नक्की काय म्हटलंय?

मुंबईला महान बनविण्यात परप्रांतीयांचा वाटा आहे असे एक बेजबाबदार विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा अपमान करण्याची स्पर्धा अधूनमधून सुरू असते, पण त्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही उडी मारावी याचे दुःख आहे. फडणवीस यांच्या विधानाचे समर्थन करता येणार नाही. मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून हुतात्मा झालेल्या 105 लोकांचे त्यांना स्मरण नाही. येथील गिरण्यांच्या जमिनीवर आता मराठी माणसांची थडगी उभी राहिलेली दिसतात. त्या थडग्यांवर उपऱ्या धनदांडग्यांनी श्रीमंती मॉल्स व टॉवर्स उभे केले. त्या टॉवर्सकडे बघून मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान हा महाराष्ट्राचाच अपमान आहे. 'वाल्यां'च्या आगमनामुळे भाजपचा विकास झाला, भाजप संपन्न झाला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. तेच त्यांच्या हिताचे आहे.

First published: December 2, 2017, 9:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading