बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती या थापाच, 'सामना'तून टीका

बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती या थापाच, 'सामना'तून टीका

बुलेट ट्रेन प्रकल्पावर 'सामना'तून टीका करण्यात आलीये. जमीन आणि पैसा हा महाराष्ट्राचा आणि गुजरातचा आणि लाभ मात्र जपानचा अशी टीका सामनातून करण्यात आलीये.

  • Share this:

मुंबई, 14 सप्टेंबर : बुलेट ट्रेन प्रकल्पावर 'सामना'तून टीका करण्यात आलीये. जमीन आणि पैसा हा महाराष्ट्राचा आणि गुजरातचा आणि लाभ मात्र जपानचा अशी टीका सामनातून करण्यात आलीये. बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती होईल असं सांगणारे थापाच मारतायत असंही सामनात म्हणण्यात आलं.

राष्ट्रीय गरजांमध्ये जपानची ही अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन बसते का असा प्रश्नही सामनातून विचारण्यात आलाय. बुलेट ट्रेन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या छाताडावरूनच धावणार असल्याचा घणाघाती आरोप सामनातून झालाय.

काय म्हटलंय 'सामना'च्या संपादकीयात?

मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनचा साफ बोजवारा रोज उडत असला तरी आता अहमदाबाद ते मुंबई अशी बुलेट ट्रेन धावणार आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणातील अनेक रेल्वे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडून पडले आहेत. महाराष्ट्राचे आमदार-खासदार त्यांच्या मतदारसंघातील रेल्वे प्रकल्पांबाबत मागण्या करीत आहेत. त्या तशाच अधांतरी ठेवून ‘बुलेट ट्रेन’ न मागता मिळत आहे. बुलेट ट्रेन हा नक्की कोणत्या समस्यांवर उतारा ते माहीत नाही; पण हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न होते व त्या स्वप्नपूर्तीची सुरुवात आज होत आहे.

पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत १४ सप्टेंबरच्या मुहूर्तावर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शिलान्यास होणार आहे. मोदी यांचे हे स्वप्न आहे व पंतप्रधानांचे स्वप्न हे देशाचे स्वप्न आहे. त्यांच्या स्वप्नाला विरोध करण्याचा कर्मदरिद्रीपणा आम्ही कदापि करणार नाही, कारण पंतप्रधान जे करीत आहेत ते राष्ट्रहित डोळय़ासमोर ठेवूनच करीत आहेत. पंडित नेहरूंनी भाक्रा-नांगलपासून भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरपर्यंत अनेक सार्वजनिक उपक्रमांचा पाया घातला. देश तंत्रज्ञान, विज्ञानात पुढे जावा यासाठी अनेक योजनांची पायाभरणी केली. कारण ती सर्व देशाची गरज होती. या राष्ट्रीय गरजांत जपानची अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन बसते काय, एवढाच काय तो मुद्दा आहे.

या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातूनही जमीन संपादन करावी लागेल. त्यामुळे बुलेट ट्रेन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या छाताडावरूनच धावणार हे नक्कीच. ‘बुलेट ट्रेन’ला आमचा विरोध असण्याचे कारण नाही, पण आधी शब्द दिल्याप्रमाणे काहीच घडताना दिसत नाही. हा संपूर्ण प्रकल्प जपान सरकारच्या पैशाने व सहकार्याने पूर्ण केला जाईल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात आता १ लाख ८ हजार कोटी केंद्राला खर्च करावे लागतील व महाराष्ट्राला त्यातले किमान ३० हजार कोटी रुपये नाहक द्यावे लागतील. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आम्ही लढा उभा केला. तेव्हा कर्जमुक्ती केली तर राज्यात अराजक माजेल आणि अराजक माजावे अशी काही लोकांची इच्छा असल्याचा गळा मुख्यमंत्र्यांनी काढला होता. मग आता पंतप्रधानांच्या ‘श्रीमंत’ स्वप्नासाठी ३० ते ५० हजार कोटी रुपये टाकत आहात. त्यामुळे अराजक माजणार नाही काय, याचे उत्तर मिळायलाच हवे. शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची मागणी वर्षानुवर्षांची आहे. बुलेट ट्रेनची मागणी तर कुणीच केली नाही, पण कोणतीही मागणी नसताना एका रेल्वे रुळावर ३० हजार कोटी उधळणे यास काय म्हणायचे?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2017 09:34 AM IST

ताज्या बातम्या