अयोध्येत आम्हाला रोखण्याचं कारस्थान, शिवसेनेचा आरोप

अयोध्येत आम्हाला रोखण्याचं कारस्थान, शिवसेनेचा आरोप

अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्यांचं ब्लडप्रेशर वाढलंय आणि त्यांच्या २०१९ च्या निवडणुकीतील रोजीरोटीचा प्रश्नं निर्माण झाला आहे.

  • Share this:

23 नोव्हेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्यांचं ब्लडप्रेशर वाढलंय आणि त्यांच्या २०१९ च्या निवडणुकीतील रोजीरोटीचा प्रश्नं निर्माण झाला आहे. त्यामुळेच अयोध्येत शिवसेनेला रोखण्याचं कारस्थान होत असल्याचा आरोप आज सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. अयोध्येला निघण्यापूर्वीच सामनाच्या अग्रलेखातून ठाकरी शैलीत भाजपवर टिकेचे बाण सोडण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे आज अयोध्येला रवाना होणार आहे. परंतु, अयोध्येत होणाऱ्या सभेला उत्तरप्रदेश पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सेनेनं इतर ठिकाणी सभा घ्यावी लागणार आहे. आज शिवसेनेनं आपल्या मुखपत्र 'सामना'तून 'आम्ही अयोध्येकडे  निघत आहोत' या आशयाखाली अग्रलेख प्रसिद्ध केला आहे. यात अग्रलेखात भाजपवर टीका केली आहे.

राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?

आमच्या अयोध्या यात्रेने कुणाचे ‘ब्लडप्रेशर’ वाढले आहे तर मुठीतील राजकीय हिंदुत्वाची वाळू सरकू लागल्याने काहींच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. राममंदिर हा विषय असा हातून निसटू लागला तर 2019च्या रोजीरोटीचे काय, या पक्षघाती झटक्याने अनेकांच्या जिव्हा पांगळ्या झाल्याय. काहीही करून शिवसेनेला रोखा अशी गिधाडे ज्यांच्या मनात फडफडू लागली आहेत त्यांना आमचा पुनःपुन्हा तो आणि तोच सवाल आहे की, हे इतके कष्ट घेऊन कारस्थान करण्यापेक्षा सरळ अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही? असा थेट सवाल सेनेनं विचारला आहे.

तारीख तुम्हीच सांगा

आमच्या अयोध्या यात्रेमुळे अनेकांच्या नाडीचे ठोके चुकले आहेत व अनेकांच्या नाड्या सुटल्या आहेत. म्हणूनच आम्ही सांगतोय, ‘ठाकरे’ अयोध्येत निघाले आहेत, पण मंदिर निर्माणाची तारीख तुम्हीच आम्हाला सांगा असा टोलाही सेनेनं भाजपला लगावला.

'जय श्रीराम'घोषणा ही जुमलेबाजी नाही

आम्ही अयोध्येत जाण्याची घोषणा करताच स्वतःस हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणार्‍यांच्या पोटात मुरडा का यावा? शिवसेना महाराष्ट्रातून आणि देशभरातून अयोध्येत पोहोचत आहे ते काही राजकारण करण्यासाठी नाही. रामाच्या नावावर मतांचा कटोरा घेऊन दारोदार फिरावे आणि निवडणुकांचा मोसम येताच सभा-संमेलनांतून ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्याव्यात ही जुमलेबाजी आमच्या रक्तात नाही असा टोलाही सेनेनं भाजपला लगावला.

योगी आदित्यनाथांवर टीका

आम्ही ‘चलो अयोध्या’चा नारा दिलेला नाही तर रामदर्शनासाठी अयोध्येत निघालो आहोत असे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. मग तरीही हिंदुत्वाचे राजकारण करणार्‍यांची भगवी वस्त्रे चिंतेने पांढरी झाली असतील तर त्यांचे भगवेपण तपासून घ्यावे लागेल. अयोध्या ही कुणाची खासगी जागा नाही. अयोध्येत आता रामराज्य राहिले नसून सर्वोच्च न्यायालयाचे राज्य आहे अशी टीकाही योगी आदित्यनाथ यांच्यावर करण्यात आली.

=====================

First published: November 23, 2018, 7:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading