यंदा रब्बी क्षेत्रात 60 लाख हेक्टरपर्यंत वाढ, कृषीमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

यंदा रब्बी क्षेत्रात 60 लाख हेक्टरपर्यंत वाढ, कृषीमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

यंदा रब्बीच्या क्षेत्रात 60 लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षित असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितले.

  • Share this:

मुंबई, 6 सप्टेंबर : राज्यात खरीप हंगामाच्या धर्तीवर यावर्षी प्रथमच रब्बी हंगाम नियोजनाची राज्यव्यापी बैठक कृषीमंत्री दादा भुसे यांनी घेतली. राज्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा रब्बीच्या क्षेत्रात 60 लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षित असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितले. ही बाब विचारात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश दादा भुसे यांनी यावेळी दिले.

पुणे येथे झालेल्या या बैठकीमध्ये कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, व्यवस्थापकीय संचालक (महाबीज), कृषि विद्यापीठातील संशोधक व विस्तार संचालक, कृषि विभागाचे सर्व संचालक, सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपस्थित होते.

राज्याचे रब्बी पिकाखालील क्षेत्र सुमारे 52 लाख हेक्टर आहे. या हंगामात ज्वारी, हरभरा, गहू, मका, कांदा व भाजीपाले ही प्रमुख पिके घेतली जातात. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे धरणे, बंधारे भरले आहेत. यामुळे राज्याचे रब्बी हंगामाचे क्षेत्रात वाढ अपेक्षित असून ते 60 लाख हेक्टरपेक्षा असण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामासाठी एकूण 9.14 लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून 9.25 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियेाजन करण्यात येत असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

रब्बी हंगामामध्ये गेल्या वर्षी 27.69 लाख मेट्रीक टन खतांचा वापर झाला होता. यंदा क्षेत्र वाढीचा अंदाज घेऊन 34.60 लाख मेट्रीक टन खतांची मागणी केंद्र सरकारकडे नोंदविण्यात आली असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले.

कोकण व पूर्व विदर्भात रब्बी हंगामाचे क्षेत्र कमी आहे. तेथे दुबार पिकाखालील क्षेत्र वाढल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नांत भर पडेल. यासाठी कृषी विद्यापीठांनी संशोधन करणे आवश्यक असून तशा सूचना कृषीमंत्र्यांनी कृषी विद्यापीठांना यावेळी दिल्या. दर्जेदार कलमे रोपे उत्पादनासाठी शासकीय प्रक्षेत्रे व खाजगी रोपवाटीकांना चालना देण्याच्या सुचनाही दादा भुसे यांनी दिल्या. खरीप हंगामातील पिकांची सद्यस्थिती, सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Published by: Akshay Shitole
First published: September 6, 2020, 6:54 PM IST
Tags: cropfarmer

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading