...म्हणून शिवसेनेत प्रवेश केला, ऊर्मिला मातोंडकरांचा खुलासा

...म्हणून शिवसेनेत प्रवेश केला, ऊर्मिला मातोंडकरांचा खुलासा

'मुळात पद मिळते म्हणून मी पक्ष बदलणाऱ्यातील नाही आहे. मला शिवसेनेमध्ये काम करण्याची संधी दिसली म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला'

  • Share this:

मुंबई, 01 डिसेंबर : बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर ((urmila matondkar))यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. 'मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. हिंदू धर्माचा मी अभ्यास केला आहे. वेळ आल्यावर धर्मानुसारच वागेल', असं म्हणत मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेशाबद्दल खुलासा केला आहे. तसंच 'काम करण्याची संधी दिसली म्हणून सेनेत प्रवेश केला' असा खुलासाही त्यांनी केला.

ऊर्मिला मातोंडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मातोंडकर यांनी सेनेतील प्रवेशानंतर पुढील वाटचालीबद्दल रोखठोक मत मांडले.

'सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे. हिंदू हा सर्वात सहिष्णू धर्म आहे. मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. वयाच्या आठव्या वर्षांपासून योगसाधना केली आहे. ज्या प्रकारे देव हा मंदिराच्या गाभाऱ्यात असतो, त्याच प्रमाणे धर्म हा मनातला विषय आहे. त्यामुळे धर्माबद्दल जाहीरपणे बोलण्याबद्दल त्यात काही वाईट वाटण्यासारखे नाही', असं मत ऊर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केले.

'काँग्रेस पक्ष सोडून आता 14 महिने झाले आहे. काँग्रेस पक्ष सोडत असताना मी राजकारण सोडणार असं काही बोलले नव्हते. मुळात पद मिळते म्हणून मी पक्ष बदलणाऱ्यातील नाही आहे. मला शिवसेनेमध्ये काम करण्याची संधी दिसली म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला', असा खुलासाही उर्मिला मातोंडकर यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरात सरकारने चांगले काम केले आहे. उद्धव ठाकरे हे जनतेला मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्राला लाभले आहे. त्यांचे काम सर्वांनी पाहिले आहे. त्यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करायला आपल्याला आवडेल, मी एक शिवसैनिक म्हणून आले आहे आणि शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे, असं म्हणतं मातोंडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं.

Published by: sachin Salve
First published: December 1, 2020, 6:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या