मुंबई, 24 जानेवारी : 100 कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांची चांदीवाल आयोगासमोर उलट तपासणी सुरू आहे. 'मला परमबीर सिंग (parambir singh) यांचे परम सत्य मला उघड करायचे आहे, त्यांचे सत्य आयोगाला सांगायचे आहे याकरता मला परवानगी द्यावी' अशी खळबळजनक विनंती देशमुख यांनी चांदीवाल आयोगाकडे केली आहे.
अनिल देशमुख यांची गेल्या काही दिवसांपासूबन चांदीवाल आयोगासमोर चौकशी सुरू आहे. आज देशमुख यांनी चौकशी दरम्यान माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात खळबळ वक्तव्य केले आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली. अनिल देशमुख हे परमबीर सिंग यांचे कोणते परम सत्य सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे सचिन वाझे यांचे वकील नायडू यांनी वारंवार पोलीस सह आयुक्त मिलिंद भारंबे यांचे नाव घेवून प्रश्न विचारल्याने आगामी सुनावणीस आयोग पोलीस सह आयुक्त मिलिंद भारंबे यांना जबाबाकरता साक्षीकरता बोलावणार असल्याचे देखील बोलले जात आहे. यामुळे आता परमबीर सिंग यांचा मोठी भांडाफोड होईल का? अशीही चर्चा रंगू लागली आहे.
चांदिवाल आयोगात गेल्या काही दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उलट तपासणी सुरू आहे यावेळेस सचिन वाझे यांचे वकील नायडू हे अनिल देशमुख यांची उलट तपासणी करत आहेत. या दरम्यान अनिल देशमुख यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यावेळेस अनिल देशमुख यांनी हे खुलासे केले आहेत. अनिल देशमुख यांनी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नात अंकित आनंद आणि सलील देशमुख यांच्या नावा बद्दल आक्षेप घेतला मात्र आयोगाने विनंती फेटाळली.
अनिल देशमुख यांना विचारण्यात आलेले प्रश्न!
प्रश्न १ - हे खरे आहे का - आपण हाय प्रोफाइल असाइंट केलेल्या केसेस ह्या मुंबई पोलीस मॅन्युअल किंवा कमिशनरेटच्या बाहेर होत्या?
उत्तर - मला माहित नाही बाकी सर्व मिलिंद भारंबे यांच्या रिपोर्टमध्ये आलेले आहे
प्रश्न २ - मिलिंद भारंबे यांना प्रश्नावली कोणी तयार करून दिली होती?
उत्तर - कमिशनर ऑफिसने तयार केली असू शकते. सरकारच्या वतीने सचिन वाझे आणि परमबीर यांना परत कामावर घेतले आणि त्वरित त्यांना सीआययू या महत्वाच्या ठिकाणी नियुक्ती का केली याबद्दल माहिती विचारली होती
प्रश्न ३ - गृह विभागाकडून मागणी करण्यात आलेल्या मुद्दांवरील माहितीतील प्रश्न आणि भारंबे यांनी विचारलेले प्रश्न साम्य आहेत?
उत्तर - मला माहित नाही , प्रधान सचिव गृहविभागाकडून करण्यात आले असेल
प्रश्न ४ - तुम्हाला आलेल्या अहवालावर तुम्ही काही कारवाई केली का?
उत्तर - कोणतेही कारवाई केली नाही, मला फक्त 5 दिवस मिळाले, 30 मार्चला अहवाल गृह खात्याला मिळाला होता.
प्रश्न ५ - विद्यमान मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची बदली पोलीस महासंचालक ते पोलीस आयुक्त बदली म्हणजे खालच्या दर्जाची होती ?
उत्तर - हो , मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक दर्जाचे असतात…
प्रश्न ६ - हेमंत नगराळे यांची बदली मुद्दामहून केली कारण सचिन वाझे यांना अडकवण्यासाठी?
उत्तर - मी बदली केली नाही , बदली सरकार करत असते
हे सगळे प्रश्नोत्तर संपल्यावर अनिल देशमुख यांनी 'मला परमबीर यांचे परमसत्य आयोगाला सांगायचे आहे' परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. यावर आयोगाने अनिल देशमुख यांना कायदेशीररित्या प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले असून यानंतर आयोग निर्णय देईल की त्यावर सुनावणी घ्यायची का? यामुळे आता अनिल देशमुख प्रतिज्ञापत्र सादर करतील, त्यात काय महत्वाचे खुलासे आहेत आणि काय परमसत्य आहे हे लवकरच स्पष्ट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.