मुंबई, 18 जानेवारी : सरकार चालवताना अडचणी येत आहेत, असं महत्त्वाचं आणि सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केलं आहे. सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, माझ्या हाती स्टेरिंग भक्कम आहे. माझ्या हाती राज्याचं स्टेरिंग भक्कम आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीमध्ये अनेक मुद्द्यांवरून धुसफूस पाहायला मिळत आहे. औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर करण्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सामना रंगला आहे. कालच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मधून, ज्यांना औरंगजेब प्रिय असेल, त्यांना साष्टांग दंडवत, असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसला टोला हाणला.
तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनीही संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं. 'मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?' असा प्रश्न थोरात यांनी विचारला.
दरम्यान आमच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये सेक्युलर हा शब्द आहे, पण औरंगजेब सेक्युलर नव्हता, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
स्टेरिंग नेमकं कोणाकडे?
राज्याच्या राजकारणचं स्टेरिंग कोणाच्या हातात, यावरून गेल्या काही महिन्यांमध्ये बऱ्याच चर्चा झाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणारं ट्विट केलं, या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा गाडीतला एक फोटो टाकला. या फोटोमध्ये अजित पवारांच्या हातात स्टेरिंग आहे. त्यावेळीही या फोटोवरून बऱ्याच चर्चा झाल्या होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ३२व्या राज्य रस्ते सुरक्षा अभियानाचं उद्धघाटन झालं. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब आणि वाहतूक पोलीस दलातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहन मंत्रालय आणि वाहतूक पोलिसांनी रस्ते सुरक्षा अभियान सुरू केलंय.
संयम आणि नियम यामुळे यम दूर ठेवता येईल. डोकं असेल तर हेल्मेट घाला, हे नियमासाठी नाही तर तुमच्यासाठी आहे, अशी मुख्यमंत्री या कार्यक्रमात म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.