Home /News /mumbai /

'लॉकडाउन'मुळे जंगलात रंगला शिकारीचा डाव, 100 किलो वजनी रानडुक्कर गोळ्या झाडून ठार मारले

'लॉकडाउन'मुळे जंगलात रंगला शिकारीचा डाव, 100 किलो वजनी रानडुक्कर गोळ्या झाडून ठार मारले

रान डुकराची शिकार करण्यासाठी शिकाऱ्यांनी बंदुकीतून 12 बोअरच्या काडतुसातून गोळी झाडल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले आहे.

भिवंडी, 22 एप्रिल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने नागरिकांना  घरात बसण्यास राज्य सरकारकडून वारंवार  सांगितलं जात आहे. मात्र,  काही महाभागांनी आपला मोर्चा शिकार करण्यासाठी जंगलाकडे  वळवला असून भिवंडी तालुक्यातील सागाव-देवचोळे  हद्दीतील जंगलात बंदुकीतून  गोळ्या झाडून रानडुक्कराला ठार मारून शिकार  केल्याची घटना समोर आली आहे. शिकारीची  हौस भागवण्यासाठी  काही नागरिक जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासींना घेऊन संचारबंदीतही रानडुक्कराची शिकार करण्यासाठी  जंगलात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे शिकाऱ्यांच्या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचला असता वन कर्मचाऱ्यांच्या जाळ्यात 100 किलो वजनी रानडुक्कराची शिकार करताना दोन शिकाऱ्यांना रंगेहात अटक केली. मात्र,  शिकाऱ्यांचा बंदुकधारी मोरक्या 15 शिकारींसह फरार  झाला असून वन विभागाचे पथक त्यांचा शोध घेत आहे. रान डुकराची शिकार करण्यासाठी शिकाऱ्यांनी बंदुकीतून 12 बोअरच्या काडतुसातून गोळी झाडल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले आहे. ही घटना  भिवंडी तालुक्यातील सागाव-देवचोळे येथील शासकीय वनक्षेत्रात घडली आहे. या प्रकरणी पडघा वन परिक्षेत्र कार्यायात वन्य जीव अधिनियमच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद गजानन भोईर (वय 28, रा. माशोडीपाडा, भिवंडी) बाळू जयराम गवारी (वय 25रा. चिंचवली) असे अटक केलेल्या शिकाऱ्यांची नावे आहेत. हेही वाचा - दिलासा देणारी बातमी, 15 तासांत 610 रुणांनी दिला कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा या दोघा शिकाऱ्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. या  कारवाईत पडघा वनपरिक्षेत्रातील वनपाल अशोक काटेसकर,आर एन गोरले,जे जी भोईर वनरक्षक अजय राठोड,अमित कुलकर्णी,शरद म्हाडा हे उपस्थित होते. या कारवाईने वनविभागाने शिकाऱ्यांभोवती आपला फास अधिकच आवळला असून त्यामुळे परिसरातील सराईत शिकारी यांचे धाबे दणाणले असून मुक्या वन्यप्राण्यांना आता त्यांच्या आश्रयस्थानात मुक्त संचार करता येणे शक्य आहे. हेही वाचा - 39 दिवस व्हेंटिलेटरवर राहून कोरोनाला हरवलं, पण ओळखताही येणार नाही असा झाला चेहरा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये आरोपीवर गुन्हा नोंद असून फरार आरोपींचा शोध घेण्याचे सुरू आहे. नागरिकांनी शिकार,वन वणवा, वृक्षतोड, वनक्षेत्रात मतिउत्खनन,अतिक्रमण बाबत कोणतीही तक्रार असल्यास 1926 या टोल फ्री क्रमांकावर माहिती देता येईल. असे आवाहन पडघा वनपरिक्षेत्र अधिकारी  संजय धारवणे यांची केले आहे. शिकारीचा तपास उपवनसंरक्षक ठाणे डॉ.रामगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.वनसंरक्षक बी टी कोळेकर व वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे  करीत आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Wild boar

पुढील बातम्या