उद्धव ठाकरे कशी वाचवणार खुर्ची, भाजप चौथा उमेदवार कसा निवडून आणणार? असं आहे विधान परिषदेचं गणित!

उद्धव ठाकरे कशी वाचवणार खुर्ची, भाजप चौथा उमेदवार कसा निवडून आणणार? असं आहे विधान परिषदेचं गणित!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली विधान परिषद निवडणूक आता आणखी पेचात अडकली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली विधान परिषद निवडणूक आता आणखी पेचात अडकली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून बिनविरोध निवडणूक व्हावी, अशी अपेक्षा असताना  काँग्रेस 2 उमेदवार लढवण्यावर ठाम आहे. तर भाजपनेही 4 उमेदवार मैदानात उतरवले आहे. त्यामुळे निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन लागू असल्यामुळे विधान परिषदेची निवडून पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे  महाविकासआघाडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल सदस्य म्हणून नियुक्ती करावी अशी शिफारस करण्यात आली. पण, शिफारस करूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तो स्वीकारला नाही. त्यामुळे अखेरच महाविकास आघाडीकडून विधान परिषद निवडणूक घेण्याची विनंती करण्यात आली आणि त्याला निवडणूक आयोगाने परवानगीही दिली. त्यामुळे 21 मे रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.

पण, त्याआधी भाजपने चार उमेदवार जाहीर करून उमेदवारी अर्ज भरून मोकळे झाले आहे. भाजपकडून डॉ. अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा - 'कधी कोपर फोड...कधी ढोपर फोड', जयंत पाटलांनी सांगितल्या आईसोबतच्या आठवणी

तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित झालं आहे. तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांना  उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांच्या नावाची घोषणा खुद्द दिल्लीतून करण्यात आली. त्यानंतर बाळासाहेब थोरातांनी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचं नाव जाहीर केलं आहे.

 

विधान परिषदेवर उमेदवार कसा निवडून येतो?

विधान परिषद निवडणुकीत जर मतदान घेण्याची वेळ आली तर 1 जागा निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला आवश्यक असेल 288/(91) = 28.8 म्हणजेच 29 मते लागणार आहे. म्हणजे, प्रत्येक उमेदवारला 29 आमदारांची मत मिळवणे गरजेच आहे.

त्यामुळे भाजपने चार उमेदवार मैदानात उतरवले आहे आणि संख्याबळ आहे 105. तर महाविकासआघाडीकडे 170 संख्याबळ आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून 5 उमेदवार लढवण्याचा आग्रह आहे. जेणे करून निवडणूक बिनविरोध होईल. जर महाविकास आघाडीला 6 ते 8 उमेदवार निवडून आणण्यासाठी जास्तीच्या मतांची गरज भासणार आहे.

हेही वाचा - पुणे, मुंबईत कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन तर नाही ना? ICMR करणार तपासणी

तर भाजपचा सध्याच्या संख्याबळानुसार, 3 उमेदवार सहज निवडून आणता येतात. पण, चौथा उमेदवार जर निवडून आणायचा असेल तर त्यांना अपक्षांसह 6 ते ८ मतांची गरज भासणार आहे.  भाजप आपल्याकडे अपक्षासह 112 उमेदवार असल्याचा दावा करत आहे.

पक्षीय बलाबल

भाजप – 105, शिवसेना – 56, राष्ट्रवादी काँग्रेस –54, काँग्रेस – 44, बहुजन विकास आघाडी – 3, समाजवादी पार्टी – 3, एमआयएम – 2, प्रहार जनशक्ती – 2, मनसे – 1, माकप – 1, शेतकरी कामगार पक्ष – 1, स्वाभिमानी पक्ष – 1, राष्ट्रीय समाज पक्ष – 1, जनसुराज्य पक्ष – 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 1 आणि अपक्ष – 13

बिनविरोध निवडणूक झाली नाही तर काय होईल?

आतापर्यंत राज्यात विधान परिषद येथे मुख्यमंत्री निवडणूक लढवत असेल तर शक्यतो बिनविरोध करण्याची अलिखित प्रथा आहे. पण आता निवडणूक झाली तर वेगळे होणार आहे. 9 जागेसाठी 10 उमेदवार राहतील तर मग मतदान घेणे गरजेचे आहे, त्यात कोरोना संकटात सगळे आमदार मुंबईत आणणे, त्याचे मतदान करणे गरजेचं आहे. मतदान गुप्त पद्धतीने असल्याने पुन्हा महाविकास आघाडी असो वा भाजपा यांना दावा करत असलेले त्यांचे सर्व आमदार मतदान करून घेणे तसंच आमदार मतदान स्वत:च्या पक्षास करतील याची हमी घेऊन मतदान बंडखोरी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल.  अशातच मतदान फोडोफोडी झाली तर सत्ताधारी  महाविकास आघाडीला याचा सर्वाधिक फटका बसेल.

 

उद्धव ठाकरेंनी  काँग्रेसला दिला इशारा?

दरम्यान, काँग्रेसने विधान परिषदेसाठी दुसरा उमेदवार उभा केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. जर काँग्रेस आडमुठेपणा सोडणार नसेल तर मी विधान परिषद निवडणुक लढवणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

हेही वाचा -#MothersDay निमित्ताने रोहित पवारांनी शेअर केली आईसाठी भावूक पोस्ट

विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही आहेत. मात्र, तरी देखील काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पहिल्यापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रयत्न आहे. यासाठी काँग्रेसने एका जागेवर उमेदवार द्यावा अशी विनंती करण्यात आली होती. परंतु, काँग्रेस दोन उमेदवार उभे करण्यात आले आहे.

 

विधान परिषदेवर या  9 जागा रिक्त

मागील निवडणुकीत आलेल्या संख्याबळानुसार, विधान परिषदेवर भाजपकडून 3 जागा रिक्त आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस – 3, काँग्रेस – 2, शिवसेना – 1 जागा आहे.

भाजपकडून स्मिता वाघ,  अरुण अडसड आणि पृथ्वीराज देशमुख या सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून  हेमंत टकले, आनंद ठाकूर आणि किरण पावसकर या सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या आहे आणि काँग्रेसकडून  हरिभाऊ राठोड,  चंद्रकांत रघुवंशी यांनी  निवडणुकाआधीच राजीनामा दिला आहे. अशा या 9 जागांवर आता निवडणूक होत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 10, 2020, 2:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading