मुंबई, 06 मार्च : मुंबईत स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणात मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्याकडे का देण्यात आला, असा सवाल भाजपनंतर आता मनसेनंही उपस्थितीत केला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. सचिन वाझे यांनी 2008 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचा गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस ह्या त्यांच्या कडेच का सोपवल्या जातात? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.
श्री सचिन वाझे ह्यांनी 2008 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचा गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस ह्या त्यांच्या कडेच का सोपवल्या जातात??? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात???
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 6, 2021
तसंच, 'शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?' असा प्रश्नही संदीप देशपांडेंनी विचारला आहे.
25 फेब्रवारीला दक्षिण मुंबईतील हाय प्रोफाइल समजल्या जाणाऱ्या पेडर रोड जवळील कारमायकल रोडवर एक संशयास्पद स्कॉर्पियो कार सापडली होती. या कारची तपासणी केल्यावर त्यात 25 जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. या जिलेटीनच्या कांड्या स्फोटक नसल्या तरी त्या स्फोट घडवण्यासाठी महत्वाच्या भूमिका बजावतात. त्याचबरोबर या कारमध्ये एक धमकी पत्रही मिळालं होतं. प्रकरण अतिसंवेदनशील झालं.
मुंबई पोलिसांबरोबर राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA चा तपास सुरू झाला. दुसऱ्याच दिवशी संशयास्पद स्कॉर्पियो कारचा मूळ मालक पोलिसांच्या समोर आला. मनसूख हिरेन त्याचं नाव. ठाण्याला घोडबंदर रोड जवळ राहणारे छोटे उद्योजक अशी त्यांची ओळख होती.
मनसुख हिरेन स्वत: पोलिसांच्या समोर आले आणि त्यांनी त्यांची स्काँर्पियो कार आठवडाभरापूर्वीच चोरीला गेली असल्याचं सांगितलं. पोलिसांचा तपास सुरू होता. अधिवेशन आठवड्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी ठाण्यातील रेती बंदरजवळील खाडीत दलदलीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, MNS, Mumbai, Sachin vaze, Sandeep deshpande, Shivsena, Twitter