गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खळबळजनक दाव्याने महाराष्ट्रात भाजपच्या अडचणी वाढल्या!

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खळबळजनक दाव्याने महाराष्ट्रात भाजपच्या अडचणी वाढल्या!

गृहमंत्र्यांनी असा दावा केल्याने या मुद्द्यावरून आगामी काळात भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : 'भारतीय जनता पक्षाचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून, त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व घेतल्याची तक्रार मला पात्र झाली होती. त्या तक्रारीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. रुबेल जोनू शेख याला अटक करण्यात आली असून चौकशीत तो बांगलादेशी असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत,' असा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. थेट गृहमंत्र्यांनी असा दावा केल्याने या मुद्द्यावरून आगामी काळात भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळविले असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. रुबेल हा भाजपाचा पदाधिकारी असून या पक्षाने कोणतीही शहानिशा न करता त्याला पद कसे दिले? बेकायदेशीररित्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहणाऱ्या अशा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काही समाज विघातक कार्य केल्यास त्याची जबाबदारी भाजप घेणार का? असा प्रश्नसुध्दा महेश तपासे यांनी उपस्थित केला होता. तसेच ही बाब गंभीर स्वरुपाची असल्याने याची चौकशी करण्याबाबतचे निवेदन व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले होते.

कसा लागला शोध? पोलिसांनी दिली माहिती

या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी याचा तपास केला असता चौकशीदरम्यान त्यांच्या घरात प. बंगाल राज्यातील मलापोटा ग्रामपंचायत, जिल्हा - 24 उत्तर परगणा येथील ग्रामपंचायत रहिवाशी दाखला तसेच बोलगंडा आदर्श हायस्कूल जिल्हा - नादिया येथील शाळा सोडल्याचा दाखल मिळाला होता. पोलिसांनी मलापोटा ग्रामपंचायतमध्ये जावून चौकशी केली असता रुबेल जोनू शेख याचा नावाचा कोणताही रहिवासी दाखला देण्यात आलेला नाही अशी माहिती समोर आली.

तसंच जिल्हाधिकारी कार्यालय, नादिया पच्छिम बंगाल येथील रेकॉर्ड तपासून पाहिले असता रुबेलकडे असलेला दाखला हा दुसऱ्याच कोणाच्या तरी नावावर असलेल्याचे समोर आले.

हेही वाचा - 10 वीच्या प्रश्नपत्रिकेत शेतकऱ्यांचा 'उपद्रवी आणि दंगलखोर' उल्लेख; नवा राजकीय वाद उफाळला

यानंतर पोलिसांनी रुबेलच्या घरात सापडलेला शाळा सोडल्याबाबतच्या दाखल्याचे जिल्हा शाळा निरीक्षक ए.स. जि. नादिया, राज्य प.बंगाल येथील रेकॉर्ड तपासून पाहिले असता सदर दाखल्यामध्ये नमूद करण्यात आलेली बोलगंडा आदर्श हायस्कूल, बोलगंडा जि. नादिया ही शाळाच अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. याच सर्व खोट्या कागदपत्राच्या आधारावर त्याचे आधार कार्ड व पॅनकार्ड सुध्दा काढल्याचे तपासात समोर आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: February 20, 2021, 7:09 PM IST

ताज्या बातम्या