मुंबई, 22 मार्च : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी पत्रामुळे अडचणीत सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी बाजू घेतली. त्यानंतर आता खुद्द देशमुख यांनी समोर येऊन हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याबद्दलची माहिती देत भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.
अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे नागपूरच्या रुग्णालयात उपचार घेत होते. याबद्दल देशमुख यांनी ट्वीट करून आपण पत्रकार परिषद का घेतली याचा खुलासा करत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार कला आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 22, 2021
'मला कोविड झाल्यामुळे नागपूर येथील एनालिक्स हॉस्पिटलमध्ये 5 ते 15 फेब्रुवारी दरम्यान उपचारासाठी दाखल होतो. 15 तारखेला मला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यावेळी हॉस्पिटलमधून बाहेर जात असताना गेटवर पत्रकार होते. त्यांनी मला बोलण्याची विनंती केली. तेव्हा हॉस्पिटलच्या परिसरातच पत्रकारांशी संवाद साधला होता' असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.
तसंच, हॉस्पिटलमधून मी बाहेर पडल्यानंतर मी घरी गेलो होतो, त्यानंतर होमक्वारंटाइन होतो. घरातून बाहेर सुद्धा पडलो नाही असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं.
अनिल देशमुख ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते त्याबद्दलचे कागदपत्र सुद्धा समोर आले आहे. यामध्ये 5 ते 15 फेब्रुवारी अनिल देशमुख हे कोरोनाबाधित झाले होते, असे डॉक्टारांनी स्पष्ट केले आहे.
तसंच, 15 तारखेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आले होते, त्याबद्दलचे डिस्चार्ज कार्ड सुद्धा समोर आले आहे. यामध्ये देशमुख यांना सकाळी 11.30 वाजता डिस्चार्ज देण्यात आला होता.
फडणवीस यांनी उपस्थितीत केले सवाल
नवी दिल्लीमध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांनी पत्रामध्ये केलेले आरोप खोटे असल्याचे पवारांनी वाचून दाखवले. ही पत्रकार सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांचे 15 तारखेचे एक ट्वीट रिट्वीट करून पवारांना सवाल विचारला.
परमवीर सिंग यांच्या पत्रावर श्री शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे. आता नेमके कोण दिशाभूल करते आहे? pic.twitter.com/adujxqxaBU
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2021
'15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाइन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?' असा सवाल फडणवीसांनी केला.
पवारांकडून पाठराखण
'अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरू आहे. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचे जे पत्र लिहिले होते. त्यामुळे सचिन वाझेंना भेटायला बोलावलं असा दावा करण्यात आला आहे. पण त्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीला देशमुख हे रुग्णालयात दाखल होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत. त्यानंतर 27 फेब्रुवारीपर्यंत ते क्वारंटाइन होते. त्याच दिवशी ते वाझे यांना भेटले असल्याचा दावा करण्यात आला होता. जेव्हा चौकशी होईल तेव्हा सत्य बाहेर येईल, असं पवार स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.